औरंगाबाद : स्थायी, विषय समितीच्या निवडणूकीला स्थगिती

औरंगाबाद : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील महापालिका, नगरपालिका व नगर पंचायतीच्या स्थायी समिती, विषय समितीच्या सभापती, सदस्य निवडीच्या निवडणूकीला स्थगिती देण्यात आली आहे. राज्य सरकारने यासंबंधीचे आदेश आज शुक़वारी काढले आहेत.

कोरोना व्हायरसमुळे राज्यातील १४७ व्यक्ती बाधित झाल्याचे आढळून आले आहे. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी संचारबंदी लागू केली आहे. साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम १८९७ ची अंमलबजावणी राज्यात सूरु केली असून त्यानुसार संचालक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांना सदर अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

मनपा अधिनियम व महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायत अधिनियमातील कलमान्वये स्थायी समिती, विषय समिती, सभापती, सदस्य निवडीला पुढील आदेशापर्यत स्थगिती देण्यात येत आहे. सदरील आदेश विवेक कुंभार, अवर सचिव यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहे.