मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट, बीडचा फैसल खान अटकेत

बीड : राजकीय द्वेषाने सोशल मीडियावर पोस्ट टाकून ती व्हायरल करणे हे बीडच्या एका युवकाला चांगलेच महागात पडले आहे. सिरसाळा (ता.परळी) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरुणाला गुजरात सायबर पोलिसांनी नोटीस बजावत अटक केली आहे. फैसल खान युसूफझाई असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, गुजरातचे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्याबद्दल फैसल या २० वर्षीय युवकाने सोशल मीडियावर अपमानास्पद पोस्ट शेअर केली होती. त्याने हा प्रकार १५ महिन्यांपूर्वी केला होता. तसेच मुख्यमंत्री रूपाणी यांनी गेल्या वर्षी कोरोना पॉझिटिव्ह चाचणी केल्याचा खोटा दावा केला होता.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत अहमदाबाद शहरातील सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक के.के मोदी यांनी सिरसाळा येथील फैसल खान युसूफझाई याच्यावर तक्रार दाखल केली होती. १८ एप्रिल २०२० रोजी फैसलवर गुन्हा नोंदवण्यात आला होता.

हा गुन्हा दाखल केल्यानंतर आता याप्रकरणी १५ महिन्यानंतर अहमदाबाद सायबर पोलिसांच्या पथकाने आरोपी फैसलला नोटीस बाजावत अटक केली आहे. फैसल हा सिरसाळा येथे मोबाईल शॉपीचे चालवत आहे. दरम्यान, गुजरात पोलिसांच्या या कारवाईमुळे नाहक खोट्या पोस्ट करून द्वेष निर्माण करणाऱ्यांवर वचक निर्माण होईल अशी अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या