औरंगाबाद जिल्हा परिषदेत नियम डावलून अध्यक्षांच्या भावाला दिले पद; छावा संघटनेकडून निषेध!

औरंगाबाद :अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील शिरवत व युवक जिल्हाध्यक्ष किरण काळे पाटील यांंच्या नेतृत्वात जिल्हा परिषद कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करत जिल्हा परिषदेच्या कारभाराचा निषेध व्यक्त करण्यात आला. जि.प.बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता या पदाचा कारभार सेवाजेष्ठ अभियंत्यांना डावलुन नियमबाह्य पद्धतीने सिल्लोड येथील उप अभियंता के.एस.भोसले यांना देण्यात आला आहे.

के.एस.भोसले हे जि.प. अध्यक्ष यांचे चुलत भाऊ असल्याने राजकीय दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. ठेकेदार व नेतेमंडळी यांचे खिसे भरण्यासाठी भोसले यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला. यामुळे औरंगाबाद जिल्हा परिषद बांधकाम विभागातील ४९ सेवा जेष्ठता असलेल्या अभियंत्यावर अन्याय झाला आहे. या सर्व प्रकरणामध्ये अध्यक्षांच्या अवती भोवती फिरणारे हे अधिकारी व कर्मचारी आहेत.

सामान्य प्रशासनाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा याला वरदहस्त असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. सोबतच मागण्या मान्य न झाल्यास अ.भा.छावा संघटना औरंगाबाद हायकोर्टात जनहित याचिका दाखल करणार असल्याचा इशारा युवक जिल्हाध्यक्ष किरण काळे पाटील यांनी यावेळी दिला. या आंदोलनात बाळासाहेब शिंदे, गणेश आदमाने, ईब्राहिम शेख, अंकुश फुलकर, महेंद्र वंजारे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या