कर्करोगावर मात करण्यासाठी हवा सकारात्मक विचार

upset girl

“मॅडम, मला माझं जीवन संपवायचं आहे.”. साधारण तिशीतली “ती” रडत रडत बोलत होती. “मला एक चांगला डॉक्टर सुचवा जो मला ह्यासाठी मदत करेल. मला शांतपणे मृत्यू हवा आहे. मला खरोखर जगण्याची इच्छा नाही.”

समुपदेशनाच्या सत्रादरम्यान “ती” काही केल्या शांत होत नव्हती. तिला ‘स्तनांच्या कर्करोगाचे’ निदान झाले होते. आणि जेव्हा तिला हे समजलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती. तिच्या आईचीही अवस्था ह्यापेक्षा वेगळी नव्हती. चांगल्या कंपनीमध्ये मॅनेजर असलेली, महत्वाकांक्षी स्वभावाची अशी “ती” स्वतःच्या मेहनतीने स्वतःचं करीअर घडवत होती. घरच्यांचीही भरभक्कम साथ होतीच. आणि हे सगळं कागदाच्या घडीसारखं चाललेलं “ती”चं आयुष्य ‘Breast cancer at last stage’ ह्या निदानाने विस्कटलं गेलं होतं.

तिची आईसुद्धा हे सगळं सांगत असताना स्वतःला शांत ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती. एकीकडे मुलीचं सांत्वन करताना दुसरीकडे स्वतःच्या डोळ्यातले अश्रू लपवत होती.  खरोखर…. असे अचानक झालेले आघात त्या आजारी व्यक्तीबरोबरच संपूर्ण घराला आजारी करतात. दोघींनाही मी तसंच बोलतं ठेऊन पूर्णपणे मोकळं होऊ दिलं.

“जर तुला खरोखरच मरायचं आहे तर मग तुला शांत मृत्यू का हवा आहे?” मी तिला विचारले.

“मॅडम, तुम्ही ठीक आहात ना?” माझ्या ह्या प्रश्नाचा तिला राग आला. “त्रासदायक  मृत्यूची कोणाची इच्छा असते ?” तिने  काहीश्या घुश्यातच  विचारलं.

” बरोबर आहे तुझं म्हणणं. कोणालाही त्रासदायक किंवा वेदनादायी मृत्यू नकोच असतो. आणि ह्या तुझ्या निर्णयाने तुला खरोखर शांत मरण येईल का?”

माझ्या ह्या प्रश्नावर ती गप्प झाली.  खिन्न हसून  म्हणाली;  “होय मॅडम! बरोबर बोलताय तुम्ही. पण मला कळूनही वळत नाहीये. मला माहित आहे की माझा आजार पूर्णपणे बरा होणारा नाही.  परंतु मी असहाय स्थितीत मरण्यास तयार नाही. मला शेवटपर्यंत आनंदी  जीवन जगायचं होतं. खूप काही मिळवायचं होतं. पण…….”

थोडं थांबून एक एक शब्द उच्चारत ती म्हणाली;”मला हेही माहित आहे की माझ्यावर आता कसे उपचार होणार आहेत. आणि ह्या सगळ्यातून जायला मला स्वतःला खंबीर करायचंय. तुम्ही मला मदत कराल का? मला खात्री आहे की मला तणाव कमी करण्यास  तुमची मदत  नक्कीच होईल. आणि मी ह्या ट्रीटमेंटला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देऊ शकेन.” आणि त्या दिवसापासून आमची समुपदेशनाची सत्रं चालू झाली. एकाबाजूला “ति”ची कॅन्सरची ट्रीटमेंट चालू होतीच. हळूहळू ती उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देऊ लागली. समुपदेशनामध्ये ‘वास्तवतेचा स्विकार’, ‘आलेल्या परिस्थितीशी सामना’, ‘तणाव नियोजन’, ‘सकारात्मक विचार’ अशा गोष्टी अंतर्भूत केल्या  गेल्या . “ति”च्या घरच्यांसाठीही काही सत्रं ठेवली गेली. ह्याचे फळ नंतर “ति”ला मिळालेच. मोठ्या जिद्दीने आणि खंबीर मनाने तिने आलेली परिस्थिती हाताळली.

आज “ती” गेली पाच वर्षं यशस्वीपणे कॅन्सरचा सामना करतेय. पण अत्यंत सकारात्मकतेने. हळूहळू “ती”ने स्वतःच्या दैनंदिन कामांना सुरुवात केली आहे. घरातून आॅफीसची जबाबदारी घ्यायला सुरुवात केलीय.

“कर्करोग”!!!! हा  शब्दच असा आहे की हा शब्द ऐकल्यावर आपली स्थिती ही युद्धक्षेत्रात प्रवेश करण्या अगोदरच लढाई हरलेल्या योद्ध्यासारखी असते. म्हणूनच अशा रूग्णांसाठी ‘मानसिक आधार’ हा त्यांच्या उपचार पद्धतीचा महत्वाचा भाग असतो. ह्यामध्ये ती व्यक्ती अजूनही जिवंत आहे हे तिला  जाणवून देणे आवश्यक असते.  बर्याच वेळा; त्याच्या कुटुंबियांची काळजी आणि भीती रुग्णाच्या मानसिक स्थितीवर प्रचंड प्रभाव पाडू शकते. कारण रूग्ण त्याच्या चिंता लपविण्यासाठी अयशस्वी प्रयत्न करत आनंदी असल्यासारखा दाखवत असतो.

ह्यासाठी त्यांना गरज असते ती “त्यांच्यात विश्वास जागवण्याची”. शेवटी काही गोष्टी ह्या अटळ असतात. आणि आहे त्याचा स्विकार करून आपलं आयुष्य जास्तीत जास्त कसं सुंदर बनवता येईल ह्याकडे लक्ष देणं केव्हाही चांगलं. कारण; “Quality is much more important than Quantity”. खरं आहे ना!!!

 

लेखिका

दिव्या नेरूरकर

Counseling Psychologist