fbpx

पूनम महाजन यांचा कलाकार-साहित्यिकांना ‘फालतू’ सल्ला

PoonamMahajan bjp

पुणे: ‘‘विचारांना एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी कला आणि साहित्य आवश्यक असते. लोकशाहीमध्ये राजकीय भाष्य करण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु, कलाकार आणि साहित्यिकांकडून सकारात्मकतेची अपेक्षा आहे. कला, साहित्याबाबत कलाकार आणि साहित्यिकांनी जरूर सूचना कराव्यात. मात्र, ‘राजा काय करतो, प्रजा काय करते यावर कलाकार, साहित्यिकांनी फालतू भाष्य करू नये’, असा ‘अजब सल्ला’ भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार पूनम महाजन यांनी साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचे नाव न घेता शनिवारी दिला. भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित युवा संवाद यात्रेच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त कात्रज चौक ते सारसबागदरम्यान संवाद यात्रा काढण्यात आली. यादरम्यान बोलताना महाजन यांनी दिलेल्या या सल्ल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

काय आहे प्रकरण ?

काही दिवसांपूर्वी बडोदा येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात  साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी असहिष्णुतेविरोधात भाष्य करत, पुरस्कारवापसीबाबत सरकारने साहित्यिकांची भूमिका समजावून घ्यायला हवी होती असे सांगत, ‘राजा तू चुकत आहेस, सुधारले पाहिजे’ असे वक्तव्य केले होते. 

पूनम महाजन यांचा साहित्यिक तसेच कलाकारांना सल्ला

‘‘विचारांना एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी कला आणि साहित्य आवश्यक असते. लोकशाहीमध्ये राजकीय भाष्य करण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु, कलाकार आणि साहित्यिकांकडून सकारात्मकतेची अपेक्षा आहे. कला, साहित्याबाबत कलाकार आणि साहित्यिकांनी जरूर सूचना कराव्यात. मात्र, ‘राजा काय करतो, प्रजा काय करते यावर कलाकार, साहित्यिकांनी फालतू भाष्य करू नये’

पूनम महाजन यांचा सारवासारव करण्याचा प्रयत्न 

कार्यक्रमानंतर देशमुख यांच्यावरील टीप्पणीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर मात्र महाजन यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.  ‘‘कलाकार आणि साहित्यिकांकडून उत्तम कला व दर्जेदार साहित्याची अपेक्षा आहे. त्यांनी कला व साहित्याबाबत जरूर सूचना कराव्यात. कला आणि साहित्य क्षेत्रांमध्ये करण्यासारखे खूप आहे’’, असे पूनम महाजन म्हणाल्या.