भाजपचे आजचे दूध आंदोलन म्हणजे निव्वळ नौटंकी-पूजा मोरे

pooja more

बीड- दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभर गावोगावी चावड्यांसमोर दुधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांचे तीव्र आंदोलन सुरु झाले आहे. किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीसह महायुतीने आंदोलनात उडी घेतली आहे.

दरम्यान, दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या दूध बंद आंदोलनाला शनिवारी सकाळी सुरुवात झाली. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पंढरपुरात संत नामदेव पायरीला विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करुन आंदोलनाची सुरुवात केली. तर शिर्डीच्या पुणतांब्यातही शेतकऱ्यांनी बळीराजाच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत आंदोलन सुरु केले. यावेळी शेतकऱ्यांनी दुधाला भाव मिळालाच, पाहिजे अशी घोषणाबाजीही केली.

राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे शनिवारी  सकाळी आमदार राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रणीत दूध उत्पादक शेतक-यांनी आंदोलन केले. विखे यांनी महाआघाडी सरकारचा निषेध करीत दुधाला ३० रुपये हमी भाव द्या. १० रुपये लिटर अनुदान द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांनी याच मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे.  आज राज्यभरात भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षानी दूध आंदोलन पुकारले आहे.21 जुलै रोजी राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीने राज्यात केंद्र सरकार व राज्य सरकार विरोधात आंदोलन केले होते.परंतु आजच भाजपाचे आंदोलन हे केवळ राज्य सरकारच्या विरोधात असल्याने पूजा मोरे यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे.

पूजा मोरे म्हणतात की, राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्य भरात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या विरोधात आंदोलन केलं. परंतु भाजपवाले हे ढोंगी आहे कारण खरतर हा प्रश्न अतिरिक्त उत्पादन आणि लॉकडाऊन यामुळे निर्माण झाला आहे.आणि या काळात शेतकऱ्याच्या पाठीशी उभा रहायची आणि त्यांच्या मालाला भाव देण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे.परंतु त्यांनी का GST रद्द करण्याचा निर्णय घेतला नाही ? का निर्यातीवर सबसिडी दिली नाही ? एवढ्या अडचणीच्या काळात 10 हजार टन दुधाची भुकटी इतर देशातून आयात केली ? परंतु आज आंदोलन करणारे त्याविषयी कुठेच बोलायला तयार नाही.

खरच भाजपाला शेतकऱ्यांविषयी कळवळा असेल तर दोन्ही सरकारला दोष द्या आम्ही आपल्या सोबत आहोत.फक्त राजकीय विरोधापोटी राज्यसरकार बद्दल बोलत असणार तर आम्ही त्यांच्याबरोबर असणार नाही.ज्या दिवशी भाजपचे नेते शेतकऱ्यांसाठी दोन्ही सरकारविषयी बोलायला लागतील त्या दिवशी आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत असू.मुळात भाजपला दूध आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही.तरीही अजूनही वेळ गेलेली नाही.देर आये दुरुस्त आये तेव्हा केंद्राकडे या आणि मागणी मान्य करून घ्या आम्ही तुमचे अभिनंदन करू अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पूजा मोरे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

महसूल दिनापासून डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारा होणार उपलब्ध

अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळायलाच हवा… जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

सचिन सावंत यांनी ट्विटरवर केलेल्या आरोपांचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केले खंडन