fbpx

ओपिनियन पोल चुकणार; कर्नाटकात भाजपचं विजयी होणार

बेंगळुरु – कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीत कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज ओपिनियन पोलनी वर्तवला आहे. मात्र ओपिनियन पोलचे उत्तर प्रदेशप्रमाणे येथीलही अंदाज चुकतील आणि भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असं मत कर्नाटकचे माजी मुख्यंमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांनी व्यक्त केले आहे.15 मे रोजी भारतीय जनता पार्टी विजय साजरा करेल असं त्यांनी म्हंटल आहे.

बेंगळुरु रिपोर्टर्स गिल्ड आणि प्रेस क्लब ऑफ बेंगळुरू तर्फे आयोजित केलेल्या पत्रकारसभेमध्ये येडीयुरप्पा यांनी भाजपाच्या मिशन 150ची माहिती सांगितली. भारतीय जनता पार्टीने 150 जागांचे लक्ष्य ठेवले असून ते प्राप्त करण्यात आम्ही यशस्वी होऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान उमेदवार निवडीवर येडीयुरप्पा नाराज असल्याच्या बातम्या मध्यंतरी प्रसारित झाल्या होत्या. मात्र येडीयुरप्पा यांनी या बातम्या केवळ अफवा असल्याचं म्हंटलं आहे. ”गेल्या दोन वर्षांमध्ये आपण राज्याचा तीनवेळा दौरा केला. त्या सर्वेक्षणावर आधारीत आपण उमेदवारांची यादी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे दिली होती. अमित शाह यांनीही तीन सर्वेक्षणे केली आणि 95 टक्के उमेदवार योग्य असल्य़ाचे लक्षात आल्यावर त्यांनी तिकीटवाटप केल्याचं त्यांनी म्हंटलं.

येडीयुरप्पा यांचा मुलगा विजयेंद्र याला तिकीट नाकारल्याबद्दल बोलताना येडीयुरप्पा म्हणाले, तो पक्षाचा निर्णय होता. मी पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असल्यामुळे माझ्या कुटुंबातच आणखी एक तिकीट देऊ नये असा निर्णय झाला. विजयेंद्रला म्हैसूर आणि चामराजनगर येथिल प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दरम्यान कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मोदींनी कर्नाटकातील भाजपाच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी नमो अॅपद्वारे संवाद साधला.यावेळी बोलताना मोदी यांनी कर्नाटकमधील भाजप कार्यकर्त्यांचं कौतुक करताना भाजपाकडे लोक आता विश्वासाने बघायला लागले आहेत ही आश्वासक बाब आहे. भाजपा कार्यकर्ते गेल्या २०-२५ वर्षांपासून तळागळातील लोकांपर्यंत जाऊन काम करीत आहेत. त्यांनी अशीच कामगिरी राखावी, असे म्हंटले आहे.