fbpx

…तर भविष्यात भारत हिंदू पाकिस्तान होईल,शशी थरूर यांनी पुन्हा उधळली मुक्ताफळे

shashi taroor

तिरुवनंतपुरम : वादग्रस्त विधाने करून मुक्ताफळे उधळण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पुन्हा एकदा मुक्ताफळे उधळली आहेत. ‘2019 च्या लोकसभा निवडणुकीत जर भारतीय जनता पक्ष निवडून आला तर भविष्यात भारत हिंदू पाकिस्तान होईल,’ असे वक्तव्य थरुर यांनी तिरुवनंतपुरम येथील एका कार्यक्रमात व्यक्त केले.

नेमकं काय म्हणाले शशी थरूर ?
‘2019 च्या लोकसभा निवडणुकीत जर भारतीय जनता पक्ष निवडून आला तर भविष्यात भारत हिंदू पाकिस्तान होईल. भाजप दुसऱ्यांदा निवडून आली तर आपले संविधान संपुष्टात येईल. कारण त्यांच्याकडे भारतीय संविधान पूर्णपणे खोडून काढून नव्याने लिहिण्याच्या सर्व कल्पना तयार आहे. त्यांनी लिहिलेले संविधान हे हिंदू राष्टाला समोर ठेवून बनवण्यात येईल. महात्मा गांधी, नेहरु, सरदार पटेल, मौलाना आझाद आणि अन्य स्वातंत्र्य सैनिकांनी यासाठी लढाई केली नव्हती.भाजप नवे संविधान लिहिल, जे भारताला पाकिस्तानसारखा देश होण्यासाठी रस्ता मोकळा करेल. तेव्हा अल्पसंख्यांक जनतेच्या अधिकारांना काही किंमत राहणार नाही.’

भाजपने या वक्तव्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे माफीनाम्याची मागणी केली आहे. ‘शशी थरूर यांच्यावतीने राहुल यांनी माफी मागीतली पाहिजे. पाकिस्तानच्या निर्मितीसाठी काँग्रेस जबाबदार होती आणि आता पुन्हा एकदा भारताला कमी लेखण्यात आणि देशातील हिंदूंना वाईट दाखवण्याचं काम ते करत आहेत,’ असे बीजेपीचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.