सातारा जिल्हा बँकेसाठी २१ नोव्हेंबरला मतदान, २३ तारखेला मतमोजणी

सातारा जिल्हा बँकेसाठी २१ नोव्हेंबरला मतदान, २३ तारखेला मतमोजणी

blank

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक कार्यक्रम अखेर घोषित करण्यात आला आहे. सोमवार, १८ ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. २५ ऑक्टोंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणारेत. २६ ऑक्टोबर रोजी अर्ज छाननी आणि २७ रोजी उमेदवार यादी प्रसिद्ध होणार आहे. २१ नोव्हेंबर रोजी २१ जागांसाठी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

सातारा जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी ४ ऑक्टोंबर रोजी जाहीर झाली होती. परंतु, कोल्हापूर आणि पुणे बँकेसंदर्भात हायकोर्टात याचिका दखल झाल्यामुळे सातारा बँकेचा निवडणूक कार्यक्रम लांबला होता. अखेर आज शनिवारी तो जाहीर झाला. दि. ११ नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते ५ या वेळेत मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. त्याच दिवशी निकाल जाहीर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दुसरीकडे सातारा जिल्हा बँक आणि नगरपालिकेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील दोन्ही राजांमधील वाक्युद्ध देखील रंगू लागले आहे. सध्या या दोन राजांमध्ये सार्वजनिक कार्यक्रमासाठी कसे जायचे यावरून शाब्दिक वाद रंगला आहे. खा.उदयनराजे भोसले यांनी दोन दिवसांपूर्वी दुचाकीवरून जात विविध विकासकामांचे उद्घाटन केले. त्यांच्या या दुचाकी प्रवासावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी टीका केली. त्यावर उत्तर देताना उदयनराजे यांनी लगोलग प्रतिहल्ला चढवत, ‘मी दुचाकीवरून गेलो. मी चालतही जाईन, रांगत जाईन, वाटले तर लोळतही; सीट वर उभा राहून जाईन नाहीतर डोक्यावर चालत जाईन, तुम्हाला काय करायचेय?’ अशा भाषेत उत्तर दिल्याने राजांमधील हा वाद आणखी वाढला होता.

महत्त्वाच्या बातम्या