सांगली-मिरज-कुपवाड व जळगाव महानगरपालिकेसाठी १ ऑगस्टला मतदान

मुंबई : सांगली-मिरज-कुपवाड व जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक; तसेच वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी १ ऑगस्ट २०१८ रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ३ ऑगस्ट २०१८ रोजी होईल. त्यासाठी संबंधित क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेची मुदत १३ ऑगस्ट २०१८ रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या ५ लाख २ हजार ७९३ असून मतदारांची संख्या सुमारे ४ लाख २३ हजार ३६६ इतकी आहे. एकूण २० प्रभागांतील ७८जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी ३९ जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी ११, अनुसूचित जमातीसाठी १, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी २१ जागा राखीव आहेत.

जळगाव महानगरपालिकेची मुदत १९ सप्टेंबर २०१८ रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या ४ लाख ६० हजार २२८ असून मतदारांची संख्या सुमारे ३ लाख ६५ हजार १५ इतकी आहे. एकूण १९ प्रभागातील ७५ जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी ३८ जागा राखीव आहेत.अनुसूचित जातीसाठी ५, अनुसूचित जमातीसाठी ४; तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी २० जागा राखीव आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

वसई-विरार शहर महानगरपालिकेतील प्रभाग क्र. ९७ च्या रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठीदेखील १ ऑगस्ट २०१८ रोजी मतदान होईल. या सर्व ठिकाणी ४ जुलै २०१८ पासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरुवात होईल. १ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी ३ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी १० वाजता सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.