राजकारणाचा उपयोग गोरगरीबांसाठी करावा : यशवंतराव गडाख

गोपाळपुर/ भागवत दाभाडे : आज राजकारणामध्ये येणाऱ्या पिढीने आपल्या ज्ञानाचा, सत्तेचा, समाजकारणाचा उपयोग समाजातील गोर-गरीबांसाठी करावा तसेच निवडणूका आल्यावर सरकारी पैशातून विकासकामे होतात. परंतू चार लोकांना रोजगार कसा मिळेल हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आजच्या तरूण पिढीने राजकारणात येताना प्रयत्न करावा असे आवाहन जेष्ठ नेते आणि साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी केले.
सर्वाचे आशीर्वाद, प्रेम माझावर आहे. यातून मला शक्ती मिळते असेही ते म्हणाले. वयाची पंचाहत्तर वर्ष पूर्ण केल्याबद्दल नेवासा तालुक्यातील वरखेड येथे शिरसगाव गणातील नागरिकांच्या वतीने यशवंतराव गडाख यांचा नागरी सत्कार करण्यात आला. जेष्ठ नागरिक जर्नाधन ढोकणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

या कार्यक्रमात बोलताना गडाख म्हणाले, ‘शिक्षण संस्था काढणे सोपे आहे. परंतू, चालवणे अवघड आहे. जायकवाडी पट्यातील या गावांनी अनेक हाल व कष्ट घेतले आहे. मी जिल्हा बँकेचा चेअरमन असताना या भागातील अनेक शेतकऱ्यांना पाईपलाईन साठी बँके मार्फत कर्ज दिली. त्यातून या भागातील शेती बागायती होऊन नंदनवहन झाले. हा बदल सर्वात मोठी क्रांती ठरली आहे. मी खासदार, आमदार पेक्षा आपल्या भागाचा परिसराचा विकास करणांसाठी प्रयत्न केला. राजकारणात विरोधकाला कधी क्षत्रू मानले नाही तर त्यांची कामे आधी केली. दोषाचे राजकारण कधी केले नाही. म्हणून तर वकिलराव लंघे यांचा विरोधात असतांनी पण जाहीर सत्कार केला. बाळासाहेब विखे बद्दल लेख लिहला.’

त्याचबरोबर ते म्हणाले, पंचाहत्तर वर्ष मागे वळून पाहताना मला जानवते की, लोकांनी माझ्यावर आपल्या कुटूंबातील मुलगा आहे म्हणून आत्मविश्वास दिला त्यांचा मी ऋणी आहे. जुन्या पिढीने जे काम केले ते नवीन पिढीने योग्य पद्धतीने जोपासावे असे आवाहन त्यांनी केले. मागे वळून पाहताना आपला तालुका, समाज कसा राहिल यांची चिंता मला असल्याचे भावनीक उदगार त्यांनी शेवटी काढले.