पुण्यात गणेशोत्सवावरून राजकारण तापल

 

पुणे : गणेशोत्सवाचे निमित्त करून महापालिकेतील सत्ताधारी भाजप स्वतःचे ब्रँडिग करत असल्याचा आरोप काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने केला. पैशांसाठी प्रायोजक शोधण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांना दिली असल्याची टीका त्यांनी केली आहे. महापौरांनी मात्र या सर्व गोष्टींचा इन्कार केला असून, विरोधकांनी किमान गणेशोत्सवात तरी राजकारण आणू नये, असे आवाहन केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे व काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी सांगितले की भाजपाकडून पैशांची उधळपट्टी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्थायी समितीने अंदाजपत्रकात २ कोटी रुपये उत्सवासाठी मंजूर केले असताना ८ कोटी रूपयांपेक्षा अधिक खर्च करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी अधिकाºयांना वेठीस धरण्यास येत आहे. आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यासाठीच बुधवारी बांधकाम, मिळकतकर, आकाशचिन्ह अशा आर्थिक विषयांशी संबधित विभागप्रमुखांची बैठक घेऊन त्यांना प्रायोजक शोधण्याची जबाबदारी दिली आहे, असा आरोप केला.
स्थायी समितीने मंजूर केलेल्या खर्चातच उत्सव व्हावा, हवे तर स्थायी समितीकडून आणखी पैसे अधिकृतपणे वाढवून घ्यावेत, मात्र अधिकाऱ्यांना प्रायोजक शोधण्याची जबाबदारी देऊ नये, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली.