‘महाराष्ट्र पोलिसांचे राजकीयकरण; पोलिसांनी त्यांचे उत्तम असलेले नाव जपले पाहिजे’

devendra

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे असे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले होते. या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आक्रमक झाले असून त्यांनी दरेकर यांचे विरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलीसांनी दरेकर यांचेवर भादंवि कलम 509 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

यावर आज विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘या सरकारला असे वाटते कि आमच्या नेत्यांवर गुन्हे दाखल केले कि आमचे नेते यांच्या भ्रष्टाचारावर आवाज उठवणे बंद करतील, प्रवीण दरेकरांवर गुन्हे दाखल केले, त्यांना कशात तरी फसवले कि ते भ्रष्टाचारावर बोलणार नाहीत पण आम्हाला संघर्षाची सवय आहे. ५ नाही १० गुन्ह्यात तुम्ही अडकवले तरी आम्ही बोलतच राहणार आहोत.

फक्त आमची महाराष्ट्र पोलिसांकडून एकच अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांचे एवढे राजकीयकरण मी या आधी कधीही पाहिले नाही. महाराष्ट्र पोलिसांनी त्यांचे उत्तम असलेले नाव जपले पाहिजे. राजकारणामध्ये सरकारे येतात सरकार जातात पण संस्थांचे राजकीयकरण जर झाले, संस्था कायदा सोडून राजकीय दृष्ट्या वागायला लागल्या तर यातून त्या संस्थांचे नुकसान होते.’ असे स्पष्ट मत यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या