मुस्लिमांचा केवळ मतांसाठी वापर; वेळीच सावध व्हा : पंकजा मुंडे

परळी : महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते महेबुबिया शिक्षण संस्था व अंजूमन शिक्षण संस्थेच्या वतीने मराठी आणि उर्दू माध्यमातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी मुस्लिमांचा केवळ मतांसाठी वापर होत आहे वेळीच सावध व्हा असं विधान केले आहे.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी ‘हिंदू-मुस्लिम असा भेद कांही स्वार्थी राजकारणी लोकांनी केला व अजूनही तसा प्रयत्न त्यांचा चालू आहे. या लोकांनी केवळ मतांसाठी तुमचा वापर केला. विकासापासून मात्र तुम्हाला दूर ठेवले. हे लोक खरे धोकादायक आहेत, त्यांना वेळीच ओळखा व अशा स्वार्थी मंडळी पासून सावध व्हा असे सांगत योग्य वेळ आली आहे, चांगले काम करणा-या व्यक्तीच्या बाजूने उभे राहण्याची, त्यामुळे यावेळी चुकीने का होईना एक वेळ चांगला निर्णय घ्या असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

याप्रसंगी राजेश देशमुख यांनी पंकजा मुंडे या शब्द पाळणा-या नेत्या आहेत, चांगल्या वाईटाची पारख करा, चांगले काम करणा-याच्या मागे उभे रहा, त्यांचे नेतृत्व जपले तरच शहराचे भले होणार आहे असे आपल्या भाषणात म्हटले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बहादूर भाई यांनी केले. कार्यक्रमास शहरातील मुस्लिम बांधव तसेच उर्दू माध्यमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी अल्पसंख्याक समाजातील महिलांना स्वावलंबी करण्यासाठी विशेष काम मी करत आहे, त्यासाठी योजना आणली आहे. या समाजातील मुला- मुलींना चांगले शिक्षण मिळावे, ते उच्च पदांवर बसावेत यासाठी माझे प्रयत्न आहेत. मला तुमच्या जीवनात अमुलाग्र बदल करायचा आहे. सब का साथ सबका विकास याबरोबरच सब का विश्वास आम्ही जिंकला आहे असे त्या म्हणाल्या.