‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद चिघळला,विद्यापीठाचे पी.आर.ओ. निलंबित

Marathwada-University

शाम पाटील,औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी ; व्हॉटस् अ‍ॅप’ वरील वादग्रस्त लेखावर आक्षेप घेवून पँथर रिपब्लिकन पार्टी आणि स्वाभिमानी मुफ्टा संघटनेच्या आक्रमक पवित्र्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांना निलंबित करून खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत.गेल्या काही दिवसांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारण्यावरून वातावरण धुमसत आहे.त्यात शिंदेंच्या निलंबनानंतर नवीन वाद आणखी चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित पुतळ्याच्या मुद्द्यावरून जोरदार वादंग उठलेले असतानाच, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या राजकारणामागे कोण ? या मथळ्याखाली लिहलेली व्हाट्सअप पोस्ट वादात सापडलीआहे, पँथर्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे आणि स्वाभिमानी मुप्टा चे अध्यक्ष प्रा. शंकर अंभोरे यांनी या पोस्टला विरोध करत शिंदे यांच्या निलंबनाची मागणी केली, त्यामुळे गुरुवारी सायंकाळी साडेसहा च्या दरम्यान कुलगुरू बी. ए. चोपडे यांनी निलंबनाचे आदेश दिले व लगेच विभागीय चौकशी सुरू करण्यात आली.

काय आहे प्रकरण
दस्तुरखुद्द कुलगुरू डॉ. चोपडे यांनी १९ फेब्रुवारी २०१५ मध्ये शिवजयंतीच्या कार्यक्रमात बोलताना विद्यापीठात बाबासाहेबांचा भव्यदिव्य पुतळा आहे, तसाच पुतळा इतिहास वस्तूसंग्रहालयाच्या हिरवळीवर उभाण्याची घोषणा केली होती. त्यासाठी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात ४० लाख रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ. विनायकराव मेटे यांनी अलीकडेच कुलगुरूंची भेट घेवून विनाविलंब पुतळा बसविण्याची मागणी केली होती. तेव्हापासून विद्यापीठात पुतळ्याचे राजकारण पेटले आहे. काहींची सकारात्क भूमिका आहे, तर काहींचा विरोध आहे. पँथर रिपब्लिकन पार्टीचा पुतळ्यास विरोध असून, याप्रश्नी त्यांनी यापूर्वीच विद्यापीठात आंदोलन करून कुलगुरूंना निवेदन दिले आहे.
दरम्यान, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी १ सप्टेंबर रोजी आपल्या ‘व्हॉटस् अ‍ॅप क्रमांकावरून ‘छत्रपतींच्या पुतळ्याच्या राजकारणामागे कोण?’ या शीर्षकाखाली लेख लिहून तो सोशल मीडियावर टाकला. या लेखात शिंदे यांनी माजी मंत्री गाडे यांच्यावर टीका केली आहे. या लेखावर पँथर रिपब्लिकन पार्टीने तीव्र आक्षेप नोंदवत बुधवारी, ६ सप्टेंबर रोजी कुलगुरूंची भेट घेवून ‘व्हॉटस् अ‍ॅप’वर बदनामीकारक मजकूर टाकून, तो इतरांना पाठवून दोन समाजात गैरसमज पसरून दंगल भडकवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासंदर्भात पँथर रिपब्लिन पार्टीचे अध्यक्ष व माजी मंत्री गंगाधर गाडे आणि स्वाभिमानी मुफटाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शंकर अंभोरे यांच्या मागणीकरून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

पुतळा उभारण्यावरून विविध मतप्रवाह
पुतळा उभारण्यापेक्षा वसतिगृह उभारावे तसेच यापुढे विद्यापीठात एकही पुतळा उभारू दिला जाणार नाही अशी भूमिका घेत गंगाधर गाडे यांनी या संदर्भात कुलगुरूंना निवेदनही दिले होते आणि पुतळ्याचा विरोध ही नोंदवला होता, यासह पँथर्स सेनेचे सतीश पट्टेकर, दीपक केदार यांनी पुतळ्याला विरोध केला आहे तर शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरात लवकर उभारून त्याचे अनावर करण्यात यावे आशी ठोक भूमिका मराठा संघटनांनी घेतली आहे पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण, शिवसंग्राम चे विनायक मेटे, आमदार सुभाष झांबड याच्या सह अन्य संघटनांनी पुतळ्याचे समर्थन केले होते.विशेष म्हणजे रिपाइंचे(ए)बाबूराव कदम,मिलिंद शेळके यांनी देखील पुतळा उभारण्याची मागणी केली अाहे.

अखिल भारतीय छावा चे आप्पासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला निव्वळ जातीय द्वेषातून विरोध केला जात असून विरोध करणारांना शिवाजी महाराज कळलेले नाहीत त्यांना फक्त बाबासाहेबांच्या नावाने असलेल्या विद्यापीठात शिवाजी महाराजांचा पुतळा नको आहे येत्या चार दिवसात आम्ही संजय शिंदे यांचे निलंबन मागे घ्यावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्र भर आंदोलन मराठा क्रांती च्या माध्यमातून उभा करणार आहोत, एका मराठा प्राध्यापकावर कोणत्याही संघटनेने गोंधळ घातला म्हणून बेकायदेशीर रित्या कारवाई करणे म्हणजे संविधानाचा अपमान आहेअशी भूमिका मांडली .

यासंदर्भात विद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता त्यांना या पुतळ्या च्या राजकारणाचा काडीचाही रस दिसला नाही उलट विद्यापीठातील असुविधा दूर करा असा त्यांनी सूर धरला.  विद्यापीठातील वसतिगृहात वेळेवर पाणी नाही, वीज जोडणी सुद्धा व्यवस्थित नाही शिवाय शौचालय देखील स्वच्छ नाहीत नवीन वसतिगृह बांधण्यापेक्षा आहे तेच वसतिगृह आधी सुधारावेत अशी मागणी सामान्य विद्यार्थ्यांनी केली आहे .

गेले आठ दिवस झाले पुतळ्यावरून सोशल मीडिया अक्षरशः ढवळून निघाला आहे समर्थन आणि विरोध दोन्ही प्रकारातील पोस्ट सोशल मीडियावर दिसत आहेत . अद्याप शिंदे आणि कुलगुरू यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही शिवाय विद्यापीठातील प्राध्यापकांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे .