नागालँडमध्ये पोलिटिकल ड्रामा

वेबटीम : नागालँडमध्ये अल्पमतात गेलेले मुख्यमंत्री शुरहोजेली लिजियात्सू विश्वासदर्शक ठरावावेळी चक्क दांडी मारली. त्यामुळे राज्यपालांनी टी.आर. जेलियांग यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवले. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध न केल्याने दुसरा मुख्यमंत्री नियुक्त करण्याची ही देशातली पहिलीच वेळ आहे.
 नागालँडमध्ये नागालँड पीपल्स फ्रंट पक्षाची सत्ता आहे. मात्र सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच मुख्यमंत्री लिजियात्सू यांच्याविरोधात बंड पुकारले होते. त्यामुळे लिजियात्सू सरकार अल्पमतात आले होते. राज्यपाल पी. बी. आचार्य यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष इम्तिवपांग यांना विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचे आदेश दिले होते. लिजियात्सू यांनी बहुमत सिद्ध करावे यासाठी हे अधिवेशन बोलावण्याचे आदेश देण्यात आले मात्र लिजियात्सू विधानसभमध्ये आलेच नाही.
 मुख्यमंत्री विधानसभेत नसल्याने विश्वासदर्शक ठराव मांडता येत नसल्याचे विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले. विधानसभा अध्यक्षांनी विधानसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित केले आणि विधानसभा कामकाजाचा अहवाल राज्यपालांना सादर केला. त्यानंतर नागालँड पीपल्स फ्रंटच्या आमदारांनी जेलियांग यांना नेता निवडून राज्यापालांना तसे निवेदन दिले. त्यामुळे राज्यापालांनी जेलियांग यांच्याकडे सत्ता सोपवून त्यांना २२ जुलैपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे.