बड्डे स्पेशल : राजकारणातील चकवा रावसाहेब दानवे

औरंगाबाद : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे आज आपला 65 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. वादग्रस्त विधाने आणि राजकारणातील चकवा अशी रावसाहेबांची वेगळी ओळख आहे.

सध्या दानवे यांचे नाव जावई आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर झालेल्या ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्यामुळे चर्चेत आले आहे. हर्षवर्धन जाधव यांच्या आई तेजस्विनी जाधव यांनी थेट हा गुन्हा दाखल करण्यामागे दानवे यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर दानवे यांची कन्या आणि हर्षवर्धन जाधव यांची पत्नी संजना हीच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने रावसाहेब चर्चेत आहेत.

1980 मध्ये पंचायत समितीवर निवडून येत रावसाहेबांनी राजकारण सुरू केले. गेल्या चाळीस वर्षापासून रावसाहेब दानवे हे जालना जिल्ह्याच्या राजकारणावर आपली पकड घट्ट ठेवून आहेत. दोनदा आमदार आणि सलग पाच वेळेस खासदार म्हणून दानवे निवडून आले आहेत. भोकरदन आणि जाफराबाद पंचायत समिती सह जालना जिल्हा परिषदेवर ही रावसाहेबांचे वर्चस्व आहे. जिल्हा बँक ही रावसाहेबांच्याच इशाऱ्यावर चालते.

2014 मध्ये रावसाहेबांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिस्तीमध्ये रावसाहेबांचा टिकाव लागला नाही. म्हणून केंद्रीय मंत्री पद सोडून ते राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले.

राज्यात पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री झालेला होता. त्याच वेळी रावसाहेबांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली. पण तुरीला भाव देण्याच्या वक्तव्यावरुन भाजपला मोठी मानहानी राज्यभर सहन करावी लागली. तिथेच रावसाहेबांचे प्रदेशाध्यक्षपदाचे पंख छाटले गेले. प्रदेशाध्यक्ष पद मिळूनही सगळे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच घेत होते. नावाला रावसाहेब प्रदेशाध्यक्ष म्हणून राहिले होते. वास्तविक प्रदेशाध्यक्ष हा पक्षातील महत्त्वाचा घटक असतो. त्याला मुख्यमंत्रीपेक्षा पक्षात अधिक महत्व असते. जे आत्ता चंद्रकांत पाटील यांच्या बाबत पाहायला मिळते आहे.

या लोकसभा निवडणुकी पूर्वी शिवसेनेचे नेते माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी रावसाहेबांना खुले आव्हान दिले होते. तर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनीही जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. या सगळ्या परिस्थितीवर अतिशय शिताफीने रावसाहेबांनी मात केली. म्हणूनच त्यांना राजकारणातील चकवा म्हणतात. त्यांनी खोतकरांना शिताफीने माघार घ्यायला लावली आणि एक तर्फी जालना लोकसभा काबीज केली.

गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या रावसाहेबांना मुख्यमंत्रीपदाचे वेध लागलेले आहेत. त्यांचीही मनीषा कधी पूर्ण होईल, हे आत्ता सांगणे अवघड आहे. पण त्या दृष्टीने रावसाहेबांनी मार्गक्रमण सुरू केले आहे. त्यांच्या पासष्टाव्या वाढदिवसानिमित्त ते मुख्यमंत्री व्हावेत अशा शुभेच्छा आम्ही देतो.