अनेक दिवस धडाडणाऱ्या प्रचार तोफा आज थंडावल्या

टीम महाराष्ट्र देशा :- विधानसभा निवडणुकीसाठी मागच्या दोन आठवड्यांपासून सर्वच पक्षांनी अवघा राज्य पिंजून काढण्याचा प्रयत्न केला. विविध राजकीय पक्षांची प्रचाराची मुदत आज संध्याकाळी सहा वाजता संपली आहे.आज प्रचाराच्या शेवटच्या दिवसी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, शेतकरी संघटना व अपक्ष उमेदवारांनी जाहीर सभा घेवून तसेच पदयात्रा, विजयी संकल्प मेळावे, निर्धार यात्रा व रॅली काढून प्रचार केला.

आता सोमवारी (21 ऑक्टोबर रोजी) राज्यात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगानुसार मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. राज्यात एकूण 288 मतदारसंघांत 3,239 उमेदवार नशीब आजमावत आहेत. 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर होतील. राज्यात 31 ऑगस्ट 2019 पर्यंत एकूण 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 मतदारांची नोंदणी झाली आहे. असे असेल तरी मतदानाचा टक्का वाढेल का, हाच खरा प्रश्न आहे.

विधानसभा निवडणुकीची घोषणा आणि उमेदवारी अर्ज माघारीनंतर जिल्ह्यातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले. तेथून पुढे प्रचाराचा एकच धुरळा उडाला. जिल्ह्यातील दहाही मतदार संघात उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा धडाका उडवून दिला. भाजप, शिवसेनेसाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, मंत्री चंद्रकांत पाटील या स्टार प्रचारांनी सभा घेतल्या. यात आघाडीवर या प्रचाराकडून टीकचे झोड उठवण्यात आली.

आघाडीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार अमोल कोल्हे व प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सभा घेतल्या. तर ईडीच्या नोटिशीनंतर काही काळ राज ठाकरेंनी देखील मैदान गाजवत सरकारवर हल्लाबोल केला. कॉंग्रेसकडून राहुल गांधी यांच्या दोनच सभा झाल्या. तर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही सभा घेत प्रचार केला.राज्य आणि केंद्र शासनाच्या कारभाराचे त्यांनी वाभाडे काढले. तर माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा व माजी केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांच्याही कार्यक्रमांचे आयोजन काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले होते.

दरम्यान,वंचित बहुजन आघाडीने देखील प्रचारात बाजी मारली असून प्रकाश आंबेडकरांनी राज्यभरात सभा घेतल्या आहेत. तर एमआयएमकडून असदुद्दीन ओवैसी यांच्या देखील सभा या गाजल्या.आता कुणाचा प्रचार फळाला येणार हे 21 ऑक्टोबरला मतदान झाल्यानंतर 24 ऑक्टोबरला स्पष्ट होणार आहे.

महत्वाच्या बातम्या