भाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय?

डोंबिवली : भाजपा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. कल्याण गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चाकू, सुरे, तलवारी, बंदुका ताब्यात घेतल्या कुलकर्णी यांनी त्यांच्या दुकानात इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा का ठेवला होतो, याची चौकशी सध्या पोलिसांकडून सुरू आहे. धनंजय कुलकर्णी भाजपाचे डोंबिवली शहराचे उपाध्यक्ष आहेत.

भाजपच्या पदाधिकाऱ्याकडे एवढा मोठा शस्त्रसाठा आढळल्यानं शहरात एकच खळबळ उडाली आहे. हा शस्त्रसाठा सापडताच आता यावरून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर शरसंधान केलं आहे. भाजपा पदाधिकाऱ्याच्या दुकानात घातक शस्त्रांचा साठा जप्त करण्यात आला. यावर गृहमंत्री म्हणून आपण काय उत्तर देणार आहात ? पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय? असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान,रात्रभर या दुकानाची झडती घेतल्यानंतर पोलिसांनी 1 एयरगन, 10 तलवारी, 38 बटनचाकू, 62 स्टील व पितळी धातूचे फायटर्स, 25 चॉपर्स, 3 कुर्‍हाडी, 9 गुप्त्या, 1 कोयता, 5 सुरे, 9 कुकर्‍या, मोबाईल, काही रोख रक्कम असा एकूण 1 लाख 86 हजार 20 रूपये किंमतीच्या शस्त्रास्त्रांचा साठा हस्तगत केला.

हा दुकानदार गेल्या दोन-अडीच वर्षांपासून शस्त्रे विक्री करत असल्याचा क्राईम ब्रँचला संशय आहे. या दुकानदाराने गुंड- गुन्हेगारांना किती शस्त्रांची विक्री केली, त्या दिशेने देखील चौकशी क्राईम ब्रँच करत आहे.

महत्वाच्या बातम्या :