बनावट क्रमांक टाकून बिनधास्त फिरणाऱ्या युवकाला पोलिसांची तंबी

औरंंगाबाद : दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून बिनधास्त फिरणा-यास शहर वाहतूक शाखा पोलिसांनी रविवारी (दि.२) महावीर चौकात दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास पकडले. गोविंद नारायण जाधव (वय २४, रा.लालवाडी पारनेर, ता. अंबड, जि. जालना) असे दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून फिरणा-याचे नाव आहे.

छावणी शहर वाहतूक शाखा विभागाचे पोलिस अंमलदार दादासाहेब माणिकराव साबळे (वय ५५) हे रविवारी सकाळी महावीर चौकात आपल्या पथकासह कर्तव्यावर होते. त्यावेळी दुचाकी क्रमांक (एमएच-१२-क्यूएल-९३५१) वर जाणा-या गोविंद जाधव याला पोलिसांनी थांबविले.

पोलिसांनी दुचाकीच्या कागदपत्राविषयी हटकले असता तो उडवा-उडवीची उत्तरे देत होता. दरम्यान, पोलिसांना दुचाकीच्या क्रमांकाविषयी संशय आल्याने पोलिसांनी त्यांच्याजवळील ई-चलान मशिनवर दुचाकीचा क्रमांक टाकला असता तो बनावट असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी वाहतूक शाखेचे जमादार दादासाहेब साबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गोविंद जाधव याच्याविरूध्द वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक राहुल भदरगे करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या