‘महाराष्ट्र बंद’दरम्यान महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग

Gang-rape

टीम महाराष्ट्र देशा- चेंबूर नाका येथे कर्तव्यावर असलेल्या एका महिला पोलीस शिपायाचा काही आंदोलकांनी विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून १५ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.विशेष म्हणजे पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याने आंदोलकांची या गुन्ह्यतून मुक्तता करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

भीमा कोरेगाव येथील घटनेनंतर गेल्या बुधवारी करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ आंदोलनात ठिकठिकाणी झालेल्या तोडफोडप्रकरणी पोलिसांनी अनेक आंदोलकांना अटक केली आहे.गेल्या बुधवारी ‘महाराष्ट्र बंद’ आंदोलन करण्यात आले. चेंबूर परिसरात आंदोलन करून सायन-पनवेल मार्ग पूर्णपणे ठप्प करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान काही मुजोर आंदोलकांनी एका महिला पोलीस शिपायाला धक्काबुकी केली. या महिला पोलीस शिपायाने दिलेल्या तक्ररीवरून चेंबूर पोलिसांनी आंदोलकांवर विनयभंग आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे गुन्हे दाखल केले. पोलिसांनी बुधवारी रात्रीच या प्रकरणात १५ जणांना अटक केली असून सध्या हे सर्व आरोपी पोलीस कोठडीत आहेत.

३०० जणांविरुद्ध गुन्हे

चेंबूर नाका आणि खारदेवनगर येथे मोठय़ा प्रमाणात आंदोलकांचा उद्रेक पहायला मिळाला होता.आंदोलकांनी वाहनांची तोडफोड केल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ही तोडफोड करणाऱ्या २०० ते ३०० आंदोलकांवर चेंबूर आणि गोवंडी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. चेंबूर पोलीस ठाण्यात एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये १५ जण अटकेत आहेत. तर गोवंडीत ४० जणांना पोलिसांनी अटक केली आहे.