fbpx

काश्मीरमध्ये जमावाच्या मारहाणीत पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू

वेबटीम / काश्मीर –  जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे मशिदीबाहेर सुरक्षेच्या ड्युटीवर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची संतप्त जमावानं दगडानं ठेचून हत्या केली आहे. मृत पोलीस अधिकाऱ्याचं नाव मोहम्मद आयुब पंडित असे आहे.  या घटनेनंतर काश्मीरमध्ये पुन्हा एकदा प्रचंड तणावाचं वातावरण आहे.

पोलीस उपअधीक्षक असणारे मोहम्मद आयुब हे गुरुवारी रात्री पंडित नौहट्टा भागातील जामिया मशिदीबाहेर आपली ड्युटी बजावत होते. त्यामुळे पंडित हे मशिदीतून बाहेर पडणाऱ्या लोकांचे फोटो काढत असल्याचा काही लोकांचा समज झाला. यावरून काही लोकांनी पंडित यांना जाब विचारला असता त्यांच्यात वादावादी झाली. जमाव त्यांच्यावर चालून आला. जमावाला पांगवण्यासाठी पंडित यांनी हवेत गोळीबार केला. त्यामुळं संतापलेल्या जमावानं पंडित यांना घेरलं आणि त्यांना मारहाण सुरू केली. काही लोकांनी तर त्यांचे कपडे फाडून त्यांना दगडांनी मारले. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पंडित यांचा काही वेळातच मृत्यू झाला, तर आणखी तिघे जबर जखमी झाले.