चक्क पोलिसाच्याच अंगावर कार चालवून त्याला जीवे मारण्याचा थरारक प्रकार…

अभिजित कटके

पुणे , 30 जानेवारी, (हिं.स.) पोलिसाच्या हातून सुटण्यासाठी आरोपीकडून चक्क पोलिसाच्याच अंगावर कार चालवून त्याला जीवे मारण्याचा थरारक प्रकार चतुःश्रृगी मंदिर ते पाषाण रस्ता येथे घडला. घटनेत पोलीस नाईक गंभीर जखमी झाले आहे. या प्रकरणी आरोपी दीपक सोनी आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक सोनी याने नोकरीच्या आमिषाने अनेकांची हजारो रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी त्याच्यावर चतुःश्रूंगी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तो ब-याच दिवसांपासून फरार होता. दरम्यान, पोलिसांना तो चतुःश्रृगीच्या पायथ्याजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस नाईक खरात यांनी सापळा लावला होता. अनगळ पार्क येथे पोलिसांना सोनी कारमध्ये दिसला. त्यांनी त्याला खिडकी उघडण्यास सांगितले. मात्र, पोलीस आहे हे समजताच सोनी याने थेट खरात यांच्या अंगावर कार चालवली. खरात यांनी आरडाओरडा केला तरी त्याने कार न थांबवता जवळपास दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. हा थरार तेथील सर्व नागरिकांनी पाहिला. पाषाण रस्त्याजवळ खरात यांना बॉनेटवरून खाली पाडून तो फरार झाला. यामध्ये पोलीस नाईक खरात गंभीर जखमी झाले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोनी आणि त्यांच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्याचा तपास घेत आहेत.