१२५ ते १५० विषारी साप व अंदाजे २ कोटी रुपयांचे सापाचे विष पोलिसांनी केले जप्त

पुण्याजवळील चाकणमध्ये पोलिसांनी एका घरावर टाकलेल्या छाप्यात १२५ ते १५० साप आढळून आले आहेत. चाकणमधील खराबवाडी भागातील एका घरात हे साप आढळून आले आहेत. दळवी आडनावाची एक व्यक्ती हे साप पाळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या सापांची आणि त्यांच्या विषाची तस्करी होत असल्याचा संशय पोलिसांना आहे.

पोलिसांना या घरात दोन बाटल्या विष देखील सापडले आहे. त्यामुळे या सापांच्या विषाची तस्करी होत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दोन लिटर सापाचे विष जप्त केले,ज्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे 2 कोटी रुपयांची होते असे अधिका-यांनी सांगितले.

भारतात तसेच विदेशात या विषाची प्रचंड मागणी आहे. या साप विष रॅकेट मध्ये अगोदर देखील ऑगस्ट 2013 मध्ये, फरासखाना पोलिसांनी 1 कोटी रुपये मूल्याचे 500 मिली साप विष बीड जिल्ह्यातुन जप्त केले होते.