भाजी मार्केटमध्ये तुफान गर्दी, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा गोळीबार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊन घोषित केल्यानंतर आज शनिवारी चौथा दिवस आहे. भारतात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारसह देशातील सर्व राज्य विशेष खबरदारी घेत उपाययोजना करत आहेत.नागरिकांना घरामध्येच राहण्याच्या वारंवार सूचना देवून देखील लोक अजूनही बाहेर फिरत असल्याचे चित्र आहे.

आसाममध्ये लॉकडाऊन असतानाही लोकांनी सामान खरेदीसाठी गर्दी केल्यामुळे पोलिसांनी गोळीबार केल्याचं समोर आलं आहे. सामान खरेदीसाठी असंख्य लोकांनी गर्दी केली आणि त्यातील काही लोकांनी पोलिसांवरच दगडफेक केल्याने नाईलाजास्तव पोलिसांना गोळीबार करावा लागला आहे.

आसाममधील बोंगागाव जिल्ह्यामध्ये हा प्रकार घडला आहे. बोंगागाव जिल्ह्यात पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला आणि जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्जही करावा लागला. यामध्ये पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून 60 जणांना जोरहाट जिल्ह्यात अटक केली आहे

शेकडो लोक बौदी मार्केटमध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठी आणि विक्रीसाठी जमले होते. पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे.परिसरात अजूनही तणावाचे वातावरण आहे.