84 लाखाचा अपहार केल्याप्रकरणी लेखापालाला पोलीस कोठडी

sexual harassment by teacher in paithan

पुणे,: सॉफ्टवेअर कंपनीमध्ये लेखपाल म्हणून कार्यरत असताना 84 लाख 60 हजार 372 रुपयांचा अपहार करणाऱ्याला न्यायालयाने 25 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हर्षल अरूण खेडलेकर (वय 31, रा. नाना पेठ) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत अमित राजेंद्र कुलकर्णी (वय 41, रा. सहकारनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

बिबवेवाडी येथील ऑटोमॅटीक सॉफटवेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत जानेवारी 2015 ते जून 2017 या कालावधीत ही घटना घडली. या प्रकरणात हर्षल याची पत्नी निलम, राकेश मारूती जवळकर, पल्लवी जवळकर, संदीप मोरे, संतोष माणिकराव सुर्यवंशी, उमेश रमेश आढाव, ममता चौधरी यांच्यासह अन्य 3 ते 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षल हा ऑटोमॅटीक सॉफटवेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत लेखपाल म्हणून कार्यरत होता. त्याने गुन्हा दाखल असलेल्या सर्व व्यक्तींशी हातमिळवणी करून 84 लाख 60 हजार 372 रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी हर्षला याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यातील रक्कम जप्त करण्यासाठी, त्याचे आणखी कोण साथीदार आहेत का, याबाबत तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील अनंत चौधरी यांनी केली. ही मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने हर्षल याला पोलीस कोठडी सुनावली.