औरंगाबाद : कंपनी फोडून साहित्य लांबवणा-या दोघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. करोडी शिवारात ही घटना घडली होती. गजानन उर्फ गजू आसाराम घावटे (रा. जोगेश्वरी) व शेख अब्दुल वहाब शेख अब्दुल करीम (वय ५५, रा. जयसिंगपुरा, संजीवनी अपार्टमेंट) अशी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दोघांची नावे आहे. त्यांना सोमवारी (दि.१८) ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
करोडी शिवारात इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्रीचा व्यवसाय करत असलेले कैलास शिवनंद पाटील (वय ३४, रा. दिशाकुंजवन सोसायटी, बजाजनगर, वाळुज एमआयडीसी). (दि.१४) रोजी रात्री चोरट्यांनी कंपनीच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून जवळपास ३ लाख ८६ हजार ९४४ रूपये किंमतीचे कॉपरचे साहित्य लंपास केले होते. याप्रकरणी कैलास पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त सुरेश वानखेडे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देशमुख, सहायक फौजदार नंदकुमार भंडारे, जमादार किरण गावंडे, संजयसिंह राजपूत, ओमप्रकाश बनकर, राजकुमार सुर्यवंशी, धर्मराज गायकवाड, नितीन देशमुख आणि ज्ञानेश्वर पवार यांनी कंपनीतील चोरी प्रकरणाचा छडा लावत गजू घावटे याला पकडले.
पोलिसांनी शेख अब्दुल याच्या वाळुज महानगरातील भंगार दुकानातून चोरीचे दोन लाख सात हजार ९२७ रुपयांचे साहित्य जप्त केले. चौकशीदरम्यान, गजानन घावटे याने राजू साळवे (रा. उस्मानपुरा) आणि गोविंद भोपळे (रा. माजलगाव, जि. बीड) यांच्या मदतीने साहित्य चोरल्याची कबुली दिली आहे.