लूटमार मुंबईत अन् मजूरी जाधववाडीत… महाठगांस पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

औरंंगाबाद : मुंबईत लुटमार, दरोड्याची टोळी चालवणारे पंधरा दिवसांपासून औरंगाबाद शहरात शिरले असून ते मोठा दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याच्या माहितीने पोलिस हादरले होते. त्यांनी एकीकडे शोध मोहीम हाती घेत व्यापा-यांना अलर्ट केले. सुदैवाने धागेदोरे हाती लागले. झारखंड येथून मजुरीसाठी १८ जण आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी छापा मारून सेनाऊल शेख कुदूस शेख (वय ३३, रा.झारखंड) याला ताब्यात घेतले.

गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल यांना १ मे रोजी खब-याने शहरात मोठा दरोडा, चोरीसाठी टोळी दाखल झाल्याची माहिती दिली. पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त मीना मकवाना, सहायक आयुक्त रवींद्र साळोखे यांच्या आदेशाने सराफा व्यवसायिक, मोठी बाजारपेठेतील व्यापा-यांना ही माहिती देऊन काळजी घेण्याची सूचना करण्यात आली. मात्र, टोळी सापडत नसल्याने पोलिस हैराण होते. दरम्यान, सहायक निरीक्षक जारवाल यांना मुंबईतील नागपाडा पोलिसांकडून अट्टल गुन्हेगार, मोक्कामध्ये अटकेनंतर जामीन मिळताच फरार झालेला सेनाऊल शेख औरंगाबादला येऊन गेल्याची माहिती मिळाली.

गुरुवारी जाधववाडीपासून काही अंतरावरील एका मोठ्या आंबे व्यापा-याच्या गोदामावर परराज्यातील १८ ते २० जण आले आहेत. त्यात काही झारखंडचे तरुण असल्याचे गुरुवारी कळाले. मग सहाय्यक पोलिस निरीक्षक अजबसिंग जारवाल, जमादार शिवाजी झिने, राजेंद्र साळुंके, प्रभाकर राऊत, संदीप सानप यांनी सापळा रचून सेनाऊलला पकडताच त्याचे दोन इतर साथीदार पळून जात होते. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना देखील ताब्यात घेतले. उर्वरित मजूर संशयास्पद आढळले नसले तरी त्यांच्यावर कडक नजर ठेवण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले.

महत्वाच्या बातम्या 

IMP