गणेशोत्सवात पीएमपीएमएलच्या २४० बस रात्रभर धावणार

PMPML

पुणे  : गणेशोत्सवाच्या काळात देखावे पाहण्यासाठी पीएमपीएमएलमार्फत पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात रात्रभर बससेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच शहरात विविध उपनगरांना जोडणारा वर्तुळमार्ग सुरू केला जाणार आहे. संपूर्ण शहरात विविध मार्गांवर एकूण 240 बस धावणार आहेत, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी आज (गुरुवारी) पत्रकारांशी बोलताना दिली.

लाडक्या गणरायाचे  (शुक्रवारी) आगमन होणार आहे. शहरातील मंडळे मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करतात. उत्सवासोबतच सामाजिक भान राखून विविध विषयांवर समाजप्रबोधन करणारे देखावे उभे करतात. तसेच गणेशोत्सवात उत्साहाने सहभागी होणा-यां भाविकांच्या मनोरंजनासाठी गणेशमंडळे वेगवेगळे कार्यक्रम, उपक्रम राबवितात. त्याचा आस्वाद घेणाऱ्या नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सहज उपलब्ध व्हावी, असा महापालिकेचा प्रयत्न आहे.

त्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाला पिंपरी-चिंचवड शहरात रात्रभर बस सुविधा पुरविण्याची मागणी केली होती. त्यानुसार पीएमपीएमएलने रात्री बारानंतर देखील एकूण 240 बसेस विविध मार्गावर सुरू ठेवणार असल्याचे कळवले आहे. निगडीतून 59, चिंचवडगाव येथून 56, भोसरीतून 58, पिंपळेगुरव व सांगवी येथून प्रत्येकी 10, आकुर्डी रेल्वेस्टेशन येथून सात आणि चिंचवडगाव ते डांगे चौकमार्गे जाणा-या 40 बस धावणार आहेत. या सर्व बस पिंपरी-चिंचवड सोबतच पुण्यातही जाणार आहेत, असे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.

या सर्व 240 बस गणेशोत्सवकाळात रात्री दहानंतर यात्रा स्पेशल म्हणून संचलन करणार आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह पुण्यातील गणेश मंडळांचे देखावेही नागरिकांना रात्रभर पाहता येणार आहेत. याशिवाय पिंपरी-चिंचवडमध्ये 31 ऑगस्ट ते पाच सप्टेंबर या काळात विविध उपनगरांना जोडणारा विशेष सवलत दरात एक वर्तुळ मार्ग सुरू करण्यात येणार आहे. भोसरी-नेहरूनगर-पिंपरी-चिंचवड-निगडी-पिंपरी रोड-नेहरूनगर-भोसरी असा हा वर्तुळमार्ग असणार आहे. या वर्तुळमार्गासाठी प्रति प्रवासी केवळ दहा रुपये तिकीट आकारले जाणार आहे. सायंकाळी सहा ते पहाटे दोन यावेळेत प्रत्येक 20 मिनिटाला एक बस धावणार आहे. यामुळे शहरातील गणेश भक्तांना देखावे व मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्याची पर्वणी उपलब्ध होणार आहे. त्याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर काळजे यांनी केले.