प्रवासी टिकविण्यासाठी पीएमपीएमएलकडून प्रयत्न नाहीत

वाहतूक कायद्याचे अभ्यासक रणजित गाडगीळ यांची टीका

पुणे : टप्पा वाहतुकीला मिळणाऱ्या सहज मान्यतेमुळे पीएमपीएमएल वर कोणताही अंकुश रहात नाही. बसेसचे पार्किंग, भाडेवाढ, मार्ग, वेळापत्रक, स्पेअर बसेस यावर कोणाचेही नियंत्रण नसते, त्यामुळे नागरिकांना निकृष्ट सेवा मिळत आहे. पीएमपीएमएल सोबत सार्वजनिक वाहतुकीमध्ये कोणीही स्पर्धक नाही, त्यामुळे पीएमपीकडून प्रवासी टिकवून ठेवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत, अशी टिका वाहतूक कायद्याचे अभ्यासक रणजित गाडगीळ यांनी केली.  पीएमपी प्रवासी मंचच्यावतीने पीएमपी प्रवासी मेळाव्याचे आयोजन म्हात्रे पूलाजवळील इंद्रधनुष्य सभागृहात करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला  सहायक  प्रादेशिक  परिवहन अधिकारी चंद्रशेखर चव्हाण, अनिल पंतोजी, मंचाचे अध्यक्ष  जुगल राठी, विवेक वेलणकर, संजय शितोळे, सतीश चितळे उपस्थित होते. पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना जिवे मारण्याच्या धमकीचे जे पत्र आले, त्याचा निषेध प्रवासी मंचातर्फे यावेळी करण्यात आला.   पीएमपीकडे सर्वाधिक तक्रारी नोंदविणारे अनिल घुले, सु.वा. फडके, यतीश देवाडिगा, नीळकंठ मांढरे, रुपेश केसरकर, जयदीप साठे, विपुल पाटील, देवधर, संतोष विसाळ, साजिद शेख, दत्तानंद कुलकर्णी यांचा  मोफत पास देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.

रणजित गाडगीळ म्हणाले, पीएमपीएमएलला टप्पा वाहतुकीसाठी जी कायदेशीर मान्यता हवी असते, ती प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून घ्यावी लागते. त्यावेळी काही फॉर्म कार्यालयाकडे भरुन द्यायचे असतात. परंतु अशा प्रकारची कोणतेही कायदेशीर पूर्तता पीएमपीएमएल किंवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणामार्फत केली जात नाही. अर्धवट माहितीच्या आणि शुल्क पावतीच्या आधारे  सहजरित्या टप्पा  परमिट जारी करण्यात येते, हे सदोष असल्याचे त्यांनी सांगितले. पीएमपीएमएल सोबत सार्वजनिक वाहतुकीमध्ये कोणीही स्पर्धक नाही, त्यामुळे पीएमपीकडून प्रवासी टिकवून ठेवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत, अशी टिका  जुगल राठी म्हणाले, बस पास स्वस्त हवेत, त्यासोबतच अतिशय सहजरित्या प्रवाशांना पास मिळायला हवा. यामुळे जास्तीत जास्त प्रवासी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतील. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी, प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.  पीएमपी प्रवासी मंचातर्फे आयोजित मोफत पास योजना व उपक्रमात सहभागी होण्याकरीता ९८५०९५८१८९, ९४२२०१७१५६ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच   [email protected] आणि [email protected] या ईमेल आयडी वर तक्रारी पाठवाव्यात असे आवाहन मंचातर्फे करण्यात आले आहे. सतीश चितळे यांनी आभार मानले.