पीएमपी कर्मचा-यांना तुटीमुळे यंदा बोनस नाही

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) तोट्यात आणि कर्जबाजारी असल्याने कर्मचा-यांना यावर्षी सानुग्रह अनुदान आणि बोनस देण्यात येणार नसल्याचे मंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. तर बोनस मिळाला नाही तर धरणे आंदोलन आणि उपोषण करण्याचा इशारा पीएमटी कामगार संघाने (इंटक) दिला आहे.

या मुद्यावरून प्रशासन आणि कर्मचारी पुन्हा समोरासमोर आले असून या वादाचा काय तोडगा निघणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.मंडळाची संचलन तूट म्हणजेच तोटा यावर्षी रुपयांच्या घरात गेला आहे. तसेच दोन्ही महापालिकांकडेही कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. तर पुणे महापालिकेने नुकतीच दिलेली रक्कमही पासची आणि थकबाकी देण्यातील काही रक्कम बाकी आहे. त्यामुळे बोनस आणि सानुग्रह अनुदान देणे शक्य नाही, असे मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.

त्याबाबात कामगार संघटनांना नोटीसही देण्यात आली आहे. महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत पीएमपी कर्मचा-यांना बोनस देण्याचा ठराव स्थायी समितीने मंजूर केला आहे. मात्र, हा ठराव खोडत मुढे यांनी स्पष्ट केले आहे की, कामगारांना बोनस व सानुग्रह अनुदान म्हणून काही रक्कम द्यायची की नाही याचा निर्णय महापालिका नाही तर पीएमपी घेणार आहे.

दरम्यान इंटकने बोनस आणि सानुग्रह अनुदानाची रक्कम न दिल्यास १२ ऑक्टोबरपासून धरणे तर १६ ऑक्टोबरपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष विजय खराडे, महासचिव नुरुद्दीन इनमादार आणि उपाध्यक्ष अशोक जगताप यांनी याबाबत निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.

You might also like
Comments
Loading...