पीएमपी खासगी बस चालकांचा संप मागे

पुणे : पुणे महानगर परिवहन मंडळाच्या खासगी बस चालकांनी पुकारलेला संप रात्री उशीरा मागे घेण्यात आला आहे. याबाबत महापौर मुक्ता टिळक यांनी केलेली मध्यस्थी यशस्वी ठरली आहे . त्यामुळे आजपासून संपावर असलेल्या ६५३ बसेस रस्त्यावर धावणार असल्याने  पुणेकरांची गैरसोय टळणारआहे.

पीएमपीच्या ताफ्यामध्ये भाडेतत्त्वावरील सुमारे 653 बसेस आहेत. मागील अडीच महिन्यामध्ये या बसेस थांब्यावर थांबल्या नाहीत म्हणून पीएमपी प्रशासनाने अर्थात पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी या कंपन्यांना सुमारे पावणे सतरा कोटी रुपये दंड ठोठावला आहे. त्याला विरोध म्हणून शहारातील खासगी बसचे चालक गुरुवारपासून संपावर गेले आहेत. या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत खासगी बस चालक प्रतिनिधी, महापौर मुक्ता टिळक आणि मुंढे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत ट्रॅव्हल टाईम कार रेंटल कंपनीचे शैलेश काळकर, बीव्हीजी इंडियाचे विजय शिंदे, अ‍ॅन्थोनी गॅरेजेसचे जिमी जॉन, महालक्ष्मी ऑटोमोटिव्हजचे नितीन सातव  उपस्थित होते.

पीएमपीचे आईटीएमएस आणि जीपीएस यंत्रणेचे काम एनइसी कंपनी पाहत आहे. या कंपनीच्या अहवालांमध्ये दोष असल्याने या पीएमपी प्रशासनाने या कंपनीला नोटीसही बजावली आहे, असे असतानाही पीएमपी प्रशासन याच कंपनीचा अहवाल गृहित धरून कंपन्यांना दंड करत असल्याचा खासगी बस चालकांचा आरोप होता. हा दंड कंपन्यांना अमान्य असून हा भूर्दंड असल्याचे कंपन्यांनी स्पष्ट केले  होते .अखेर ठेकेदारांना केलेल्या दंडाची चौकशी करून त्यावर निर्णय घेण्याची तयारी पीएमपीएमएल प्रशासनाने दाखवल्याने हा संप मागे घेण्यात आला आहे. शुक्रवारी दिवसभर जवळपास ३०%बसेसची मार्गावर कमतरता असल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.भर पावसात रिक्षाने प्रवास करण्याचा पर्याय अनेक चाकरमान्यांनी स्वीकारला. मार्गावर पुरेशा बस नसल्यामुळे सुरु असलेल्या बस अक्षरशः तुडुंब भरून वाहत असल्याचे दृश्य बघायला मिळाले.