सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव लोगोमधून लोकमान्य टिळक गायब

lokmanya tilak & bhau rangari ganpati

पुणे : पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाचा यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने पुणे महापालिका तब्बल २ कोटींचे बजेट खर्ची घालणार आहे. महापालिकेकडून सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रचार आणि प्रसारासाठी शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचा लोगो लॉन्च करण्यात येणार आहे. मात्र आजवर ज्यांना गणेशोत्सवाचे जनक मानले जाते अशा लोकमान्य टिळकांचा फोटो मात्र या लोगोमध्ये नसणारे. याला कारण आहे ते गणेशोत्सवाचे जनक कोण या वादाचा. या वादामुळेच पुणे महापालिका या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या आयोजनात सावध भूमिका घेताना दिसत आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण इतिहास काय सांगतो

पुण्यातील मानाच्या गणपती पैकी एक असणाऱ्या श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंडळाच्या दाव्यानुसार भाऊसाहेब रंगारी यांनी सन १८९२ मध्ये म्हणजेच लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात करण्यापूर्वी एक वर्षे आधी गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली होती. भाऊसाहेब रंगारी यांच्या गणेशोत्सवाने पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाचा आरंभ  झाला. घराघरात साजरा होत असणारा उत्सव भाऊसाहेबांनी १८९२ मध्ये सर्वप्रथम सार्वजनिक स्वरूपात स्थापन केला. भाऊसाहेब लक्ष्मण जावळे तथा भाऊसाहेब रंगारी हे राजवैद्य होते. शनिवारवाडय़ाच्या मागे त्यांचे निवासस्थान आणि धर्मादाय दवाखाना होता. वैद्यकीय व्यवसायात असले तरी स्वातंत्र्य सैनिकांना त्यांचा पाठिंबा असे. याचाच परिणाम म्हणजे भाऊ साहेबांनी स्थापन केलेला हा सार्वजनिक गणेशोत्सव पुढे मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये साजरा होवू लागला

ट्रस्टच्या दाव्याला पुरावा काय ?

भाऊसाहेब रंगारी हे स्वातंत्र्यसेनानी होते. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न उराशी बाळगून धर्म-जात-पंथ बाजूला सारत बहुजन समाजाला एकत्र करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव करण्याचे त्यांनी ठरवले. १८९४ मध्ये दारूवाला पूल येथे उसळलेल्या हिंदू-मुस्लिम दंगलीच्या वेळी समाजात एकी ठेवण्यासाठी  भाऊसाहेब रंगारी यांची महत्त्वाची भूमिका होती  त्यावेळी ब्रिटिशांनी त्यांना अटक केली मात्र न्यायालयाने पुराव्यां अभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. या बाबतचे पुरावे सरकारी कागदपत्रामध्येहि मिळत असल्याचा दाखला सध्या भाऊ रंगारी गणपती ट्रस्टकडून दिला जात आहे.

जनक भाऊ रंगारी मात्र प्रसार केला लोकमान्यांनी

भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली असली तरी याचा प्रचार आणि प्रसार लोकमान्य टिळकांनीच केला हे आपल्याला मान्य करावे लागणार आहे. कारण लोकमान्य टिळक यांनी विखुरलेला समाज एकत्र यावा यासाठी पुढे प्रयत्न केले. त्यामुळे पुण्यापुरता असणारा सार्वजनिक गणेशोत्सव पुढे राज्यभरात मोठ्या दिमाखात साजरा करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे एकंदरीतच आता सुरु असणारा वाद हा भाऊसाहेब रंगारी तसेच लोकमान्य टिळक या दोन्ही थोर व्यक्तींच्या इतिहासाला गालबोट लावणारा ठरत आहे, त्यामुळे भाऊ रंगारी गणपती ट्रस्ट आणि महापालिका यांनी सामंजस्याने हा वाद हाताळणे गरजेच आहे.