fbpx

पालिका पदाधिकाऱ्यांचा परदेश दौरा रद्द

pmc

पुणे – महापालिकेचे सत्ताधारी आणि विरोधकांचा एकत्रित परदेश दौरा अखेर गुंडाळण्यात आला आहे. स्पेनमधील बार्सिलोना येथे स्मार्ट सिटीच्या परिषदेसाठी ही परदेशवारी हे पदाधिकारी पदरमोड करून करणार होते. मात्र, त्यानंतरही या दौऱ्यावर टिका झाल्यानंतर अखेर पदाधिकाऱ्यांनीच या दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

फिकी या संस्थेने स्मार्ट सिटी परिषदेचे आयोजन केले होते. स्पेन या देशातील बार्सिलोना या शहरात दि. 14 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत ही परिषद होणार होती. त्यासाठी भारतील स्मार्ट सिटींच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (पीएसडीसीएल) या स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळावरील महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि यासह सेना व कॉंग्रेस असे सहा प्रतिनिधी असतानाच सत्ताधारी भाजपच्या काही नगरसेवकांसह तब्बल अकरा जण या दौऱ्यावर निघाले होते.त्यासाठी राज्य शासनाकडे स्मार्ट सिटीकडून परवानगीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार, हे पदाधिकारी स्वखर्चाने या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, त्यानंतरही शहरातील स्वतंसेवी संस्थानी या परदेशवारी टिकाही झाली होती. त्यानंतर काही सदस्यांनी या दौऱ्यात सहभागी होण्यासाठी अडचणी उपस्थित केल्यानंतर दौरा पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर 30 नोव्हेंबरला पुन्हा या दौऱ्याचे नियोजन होते, मात्र दौऱ्यावर निघालेल्या सर्वच पदाधिकारी आणि नगरसेवक यांनी जाण्यास असमर्थता व्यक्त केल्याने अखेर हा दौराच रद्द करण्यात आला आहे.दरम्यान, या बाबीस काही पदाधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे.