खासगी सल्ल्यांसाठी पालिकेच्या तिजोरीतील ४२ कोटींचा खुर्दा

pmc

पुणे : शहराच्या विकासासाठी महापालिकेतर्फे अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प उभारले जातात. हे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, त्यामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी या विकासप्रकल्पांसाठी महापालिकेच्या वतीने खासगी सल्लागार कंपन्यांची नियुक्ती करण्यात येते. या सल्लागार कंपन्यांच्या सेवेवर आतापर्यंत तब्बल ४२.१७ कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, ज्या प्रकल्पांवर खासगी सल्लागार कंपन्यांची नियुक्ती केली आहे, त्यापैकी बहुतांशी प्रकल्प अद्याप रखडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खासगी सल्लागार कंपन्यांकडून देण्यात येणारे सल्ले महापालिकेला महागात पडत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

पुणे महापालिकेने २००७ पासून आजपर्यंत एकूण ४८ विकासप्रकल्पांसाठी खासगी सल्लागारांची नियुक्ती केली आहे. या सल्लागारांच्या सेवेपोटी आतापर्यंत पालिकेच्या तिजोरीतील ४२.१७ कोटी रुपये खर्च झाले आहेत. या प्रकल्पांपैकी १८ प्रकल्प हे पाणीपुरवठ्याशी संबंधित असून उर्वरित ३० प्रकल्प हे उड्डाणपूल उभारणे, भुयारी मार्ग बांधणे, नदी सुधारणांसंदर्भातील आहेत. या सर्व प्रकल्पांपैकी तब्बल २५ प्रकल्प विविध कारणांस्तव अपूर्ण आहेत, तर थेट प्रकल्पग्रस्तांकडूनच विरोध झाल्याने काही प्रकल्पांचे काम रखडले आहे. यासंदर्भात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी मुख्य सभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला महापालिका प्रशासनाने दिलेल्या उत्तरातून ही बाब उघड झाली आहे.
महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या विकास प्रकल्पाचा प्राथमिक अभ्यास करणे, तांत्रिक पाहणी करणे, सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे, प्रकल्पाचे बांधकाम व उभारणीदरम्यान देखरेख करणे व प्रकल्प वेळेत कार्यान्वित करणे अशा विविध कामांची जबाबदारी या खासगी सल्लागारांवर असते.

मात्र, प्रत्यक्षात ज्या प्रकल्पांवर सल्लागार कंपन्यांची नियुक्ती केली आहे, त्यापैकी बहुतांश प्रकल्प अद्याप पूर्णत्वास गेलेले नाहीत. नगर रस्ता परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी भामा आसखेड धरणापासून शहरापर्यंत १७०० मिलीमीटरची जलवाहिनी टाकण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, रेल्वेमार्गाखालून जाणारा हडपसर ते हांडेवाडी मार्ग, स.गो.बर्वे चौकातील ग्रेड सेपरेटर, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथील उड्डाणपूल, अशा अनेक प्रकल्पांमध्ये सल्लागारांच्या कामांचा अपेक्षित फायदा झालेला दिसून येत नाही.