VIDEO: पुणे महापालिकेत अभूतपूर्व गोंधळ; विरोधकांनी पळवला मानदंड

पुणे: शहरात राबवल्या जाणाऱ्या महत्वपूर्ण सायकल योजनेला आज पुणे महापालिकेच्या सभागृहात मंजुरी देण्यात आली आहे. ही मंजुरी चुकीच्या पद्धतीने दिली गेल्याचे सांगत विरोधकांनी चर्चेची मागणी केली. मात्र, सत्ताधारी भाजपकडून सभा तहकुबी मांडण्यात आल्याने सभागृहात अभूतपूर्व गोंधळ पहायला मिळाला आहे. तसेच शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी थेट मानदंडच पळवून नेहला. यामुळे काही काळ सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा जोरदार राडा झाला.

याविषयी बोलताना महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की, ‘महापालिकेच्या इतिहासात प्रथमच स्वच्छता उपविधी आणि सायकल धोरणाला मंजुरी देण्यासाठी खास सभा बोलावण्यात आली होती. मात्र विरोधकांनी राजकारण करत सभागृहात हल्लाबोल केला. या प्रस्तावाबाबत माहिती देण्यासाठी सर्व नगरसेवकांना बोलवण्यात आलं होत. मात्र गोंधळ घालत आपली पोळी भाजून घेण्याचा लाजिरवाणा प्रयत्न विरोधकांनी केला आहे.