पंतप्रधान येती सोलापूरा तोची दिवाळी दसरा

Narendra-Modi-victory

सोलापूर /सूर्यकांत आसबे – पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत.या पार्श्वभूमीवर महापालिका आणि जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे.गेल्या अनेक दिवसांपासून मळकटलेले शासकीय विश्रामगृह, मार्गावरील रस्ते तसेच ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा होणार आहे त्या इंदिरा गांधी स्टेडियमला अच्छे दिन आले आहेत.

पंतप्रधान मोदी सोलापूर दौऱ्यावर येणार म्हटल्यानंतर विमानतळासह शासकीय विश्रामगृह तसेच रस्ते चकाचक होण्याला सुरुवात झाली आहे.विमानतळ ते शासकीय विश्रामगृह तसेच शासकीय विश्रामगृह ते इंदिरा गांधी स्टेडियम या मार्गाला नवसंजीवनी आली आहे.रस्त्यांचे नूतनीकरण करण्याबरोबरच या मार्गावर रंगारांगोटीला कमालीचे प्राधान्य देण्यात येत आहे.पंतप्रधान विमानतळावरून थेट शासकीय विश्रामगृह येथे येणार असल्याने अनेक वर्षांपासून मळकटलेल्या विश्रामग्रहाला अच्छे दिन आले आहेत.

याशिवाय पंतप्रधान ज्या रस्त्यावरून इंदिरा गांधी स्टेडियमवर सभेसाठी येणार आहेत त्या रस्त्याला जीव आला आहे.डांबरीकरण करून रस्ते चकाचक करण्यात येत आहेत.सभेच्या ठिकाणापासून १०० पावलांवर असलेली चौपाटी अर्थात खाद्य पदार्थांची दुकाने हलविण्यात आली आहेत.अनेक वर्षे धूळखात पडलेल्या इंदिरा गांधी स्टेडियमचेसुद्धा भाग्य उजळले आहे.संपूर्ण स्टेडियमला रंगरंगोटी करण्यात आली आहे.या मैदानाची क्षमता साधारण ५० हजार इतकी असली तर मोदींच्या सुरक्षेच्या दृष्टीने जवळपास अर्धे मैदान सुरक्षा म्हणूनच व्यापले जाणार असून मैदानावर आणि स्टेडियमवर प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.एकूणच पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याने शासकीय विश्रामगृह,रस्ते,स्टेडियम आदींचे मात्र भाग्य उजळले असे म्हणायला हरकत नाही .