‘जनतेला लुटणाऱ्यांची तुरुंगवारी थांबणार नाही ‘

blank

पुणे : इमानदार करदाता आणि मध्यमवर्गीयांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे. चुकीच्या प्रवृत्तीला दूर करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. जनतेच्या पैशांची लूट करणाऱ्यांना गेल्या पाच वर्षांत तुरुंगाच्या दरवाज्यापाशी आणले. आता त्यांना तुरुंगात टाकण्याचे काम सुरू आहे. जनतेला लुटणाऱ्यांची तुरुंगवारी थांबलेली नाही. त्यांची आता खैर नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिला.

पुणे ही समाजसुधारकांची आणि क्रांतीकारकांची भूमी असून लोकमान्य टिळकांच्या काळात स्वराज्यासाठी लढाई झाली, आता सुराज्याची लढाई सुरू करू असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पुण्यात, स. प. महाविद्यालयाच्या पटांगणावर झालेल्या जाहिर सभेत केलं.

आपल्या भाषणाला मोदींनी मराठीतून प्रारंभ केला आणि भाषणादरम्यान पुणेकरांना प्रणामकेला. पुणे-पंढरपूर पालखी मार्गासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर कार्य करत असून पुण्यात मेट्रोचं जाळं पसरवण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं.

कलम 370 रद्द करण्यामुळे केवळ काश्मीरच नव्हे तर संपूर्ण देशातील वातावरणात सकारात्मक बदल होईल असं पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले. 21 व्या शतकातील भारत भयभीत असूच शकत नाही असं सांगून मोदी यांनी नव्या भारताच्या नव्या आव्हानांसाठी आपल्याला सज्ज रहावं लागेल असं सांगितलं. देशातील युवकांवर आपल्याला पूर्ण विश्वास आहे आणि याच विश्वासावर 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे भारत पाऊल टाकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

5 वर्षात पायाभूत सुविधांवर 100 कोटी रूपये खर्च करणार असून गुंतवणुकीत सुधारणेसाठी सरकार योग्य पाऊल उचलणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यावेळी पुणेकरांनी मोठ्या संख्येनं मतदानाला बाहेर पडून, भाजपालाच पुन्हा निवडून आणण्याचं आवाहन करत पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पुणेकरांनी मतदानाचा नीचांक नोंदवला होता.

यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, चंद्रकांत पाटील, विजय शिवतारे आदी नेते उपस्थित होते. तत्पूर्वी,पंतप्रधानांनी आज सातारा आणि बीड इथं देखील प्रचार सभा घेतल्या. छत्रपती शिवरायांचे संस्कार यापूर्वी आमच्यावर होते, पण आज छत्रपतिंचा परिवारच आमच्या सोबत आहे असं पंतप्रधान सातारा येथील सभेत म्हणाले. तर, बीड इथल्या जाहीर सभेत राज्यात भाजपाला अनुकूल वातावरण असून, महायुतीच पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या