नरेंद्र मोदी यांनी कोरोनाबाधित ब्रिटनच्या पंतप्रधानांना ट्विट करून दिला धीर

टीम महाराष्ट्र देशा –  ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनाची लक्षणं दिसत असल्याने आपण स्वत:ला विलगीकरणात ठेवत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या वृत्ताने अवघ्या जगाला धक्का बसला आहे. याआधी ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली होती.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांना ट्विट करून धीर दिला आहे. ‘आदरणीय पंतप्रधान बोरिस जॉन्सनजी, तुम्ही एक योद्धा आहात आणि या संकटावर तुम्ही निश्चिपणे मात कराल, अशा शब्दात त्यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांना ट्विट करून धीर दिला आहे. तुमच्या चांगल्या तब्येतीसाठी आणि ब्रिटनच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो, असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

याआधी जॉनसन यांनी ट्वीटरवर माहिती दिली होती कि, ‘गेल्या २४ तासांपासून मला काही हलकी लक्षणं जाणवत होती. तपासणी केली असता पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. मी सध्या विलगीकरणात आहे. मात्र मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सरकारचं नेतृत्व करत राहणार आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, ब्रिटिश राजघराण्याचे प्रिन्स चार्ल्स यांनाही कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली होती. आता ब्रिटनच्या पंतप्रधानांना कोरोनाची लागण झाल्याने गांभीर्य अधिकच वाढलं आहे. दुसरीकडे भारत सरकारने तात्काळ पावलं उचलत कोरोनाला थोपवण्याचे सर्व प्रयत्न केले आहे यामुळेच इतर देशांच्या तुलनेत भारताची परिस्थिती नियंत्रणात असल्याचं चित्र आहे.

हेही पहा –