मोदींचा राममंदिरावरून अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले…

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा आज नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारोप झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना देशातील सर्व विषयांवर भाष्य केले. राम मंदिरावरून मोदींनी आज वाचाळवीरांचाही समाचार घेतला. मात्र मोदींचे हे टोले अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला असल्याचं म्हंटल जात आहे.

दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना 370 प्रमाणेच आता सरकारनं राम मंदिराचा निर्णय घ्यावा असं म्हटलं होतं. त्यावरून काही नेत्यांनी राम मंदिराबाबत बरळायला सुरवात केली होती. यावर आज मोदींनी भाष्य केले आहे. देशात वाचाळवीरांचा सुळसुळाट झाला आहे. राम मंदिराबाबत चुकीची वक्तव्य करत आहेत. राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. सर्वोच्च न्यायालयात त्या सबंधित प्रक्रिया सुरु आहे. तरीदेखील वाचाळवीर आपली भूमिका मांडत आहेत. त्यामुळे न्यायालयाचा अपमान होत आहे. आपला सर्वांचा न्यायालयावर विश्वास पाहिजे. त्याचा सन्मान केला पाहिजे. त्यामुळे माझी वाचाळ वीरांना विनंती आहे की, राम मंदिराबाबत चुकीची माहिती आणि भूमिका मांडू नका, असे मोदी म्हणाले.

दरम्यान भाजप शिवसेना युतीत दिवसेंदिवस तिढा निर्माण होत आहे. कारण शिवसेना नेते आणि भाजप नेते यांच्यात युतीच्या जागावाटपावरून मतभेद होत आहेत. अशातच शिवसेना 144 जागांवर अडून आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना युतीत ऐन निवडणुकीच्या तोंडावर मिठाचा खडा पडणार असल्याच दिसत आहे. त्यात नरेंद्र मोदी यांनी वाचाळवीरांवरून मारलेले टोले शिवसेनेला तर बसले नाहीना असा प्रश्न आता माध्यमांमध्ये विचारला जात आहे.