झोपलेल्या मोदींना जाग करणारच – राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा : झोपी गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारला जागं करूनच राहणार असा घणाघात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी केला आहे. मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या सहा तासात दोन्ही राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करण्यात आली. काँग्रेसच्या या निर्णयाने आसाम आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना झोपेतून जागे केले आहे, पंरतु पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्यापही झोपलेले आहेत, अशी टीका राहुल गांधींनी केली.

दरम्यान, पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसला उभारी आली आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने सत्ता मिळवली. यानंतर मोठ्या धुमधडाक्यात मुख्यमंत्रीपदाचा सोहळा झाला. यानंतर राहुल गांधी बहिण प्रियंका वाड्रा आणि तिच्या मुलांसोबत सुट्टी घालवण्यासाठी शिमल्याला गेले आहे. येथूनच बुधवारी दुपारी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टिकास्त्र सोडणारे ट्वीट केले. यात त्यांनी आसाम आणि गुजरातमध्ये भाजपच्या मुख्यमंत्र्यांना जाग आली आहे, परंतु मोदी अद्याप झोपलेलेच आहेत, त्यांना जागे केल्याशिवाय राहणार नाही, असे म्हटले.