‘ब्लॅक लिस्ट’ नको तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा – चेतन तुपे

पुणे : महापालिकेच्या शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये डीबीटी (डायरेक्‍ट टू बेनिफिट) योजनेअंतर्गत तीन दुकानदारांनी निकृष्ट दर्जाचे शालेय साहित्य वाटप केले असल्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून तीनही ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट केले आहे. मात्र, फक्त ब्लॅक लिस्ट नको तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, असे निवेदन विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी आयुक्तांना दिले आहे.पुणे महापालिकेच्या 287 शाळांमध्ये साहित्य पुरविण्यासाठी महापालिकेने डीबीटी अंतर्गत जवळपास 43 विक्रेते निश्‍चित केले आहेत. मात्र, त्यांच्या दुकानांवर गर्दी होत असल्याचे कारण देत व्यावसायिकांमार्फत आता विद्यार्थ्यांना वह्या, बुट आदी साहित्यांचे वाटप थेट शाळेतच सुरू झाले आहे. मात्र, विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या साहित्यांची तपासणी करण्याचा नियमच या योजनेत नाही. यापूर्वी निविदा काढून देण्यात येणाऱ्या वस्तू मंडळाकडे आल्यानंतर त्या प्रयोग शाळेत तपासल्या जात होत्या. त्यानंतरच ठेकेदाराची बिले जात होती. त्यामुळे साहित्य निकृष्ट असल्याचे लक्षात येत होते.मात्र, आता शाळेमध्ये साहित्य विक्रीसाठी आणलेल्या व्यवसायिकांनी अत्यंत हलक्‍या प्रतिचा कागद आणि पृष्ठ असलेल्या वह्यांचे वाटप करण्यात येत आहे. अशीच अवस्था विद्यार्थ्यांच्या देण्यात येणाऱ्या बुटांची आहे. मात्र, त्यांचे वाटप बिनदिक्कतपणे सुरू आहे. यावरून राष्ट्रवादीचे नगरसेवक महेंद्र पठारे, भैय्यासाहेब जाधव तसेच योगेश ससाणे यांनी हे साहित्य घेऊन थेट स्थायी समितीच्या बैठकीतच आंदोलन केले होते. त्यानंतर 15 दिवसांच्या आत या साहित्याची तपासणी करून संबधितांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले होते. त्यानुसार कारवाई करत त्या तीन ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट करण्यात आले आहे. मात्र यावर आक्षेप घेत विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.याबाबत चेतन तुपे म्हणाले की, महापालिकेने मान्यता दिलेल्या 43 दुकानदारांमध्ये एकाच दुकानदारांनी वेगवेगळ्या संस्थांच्या नावांनी नोंदणी केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेने एका नावाने असलेली संस्था बंद केली तर दुसऱ्या नावाने संबधित दुकानदार पुन्हा या वाटप प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार आहे. त्यामुळे प्रशासनाची ही ब्लॅक लिस्ट करण्याच्या कारवाईपेक्षा फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी तुपे यांनी केली आहे.

You might also like
Comments
Loading...