सुखद! मालमत्ता करावर एप्रिल महिन्यात १० टक्के, तर मे महिन्यात मिळणार ८ टक्के सवलत

औरंगाबाद : यंदा एप्रिल महिन्यात मालमत्ता कराचा भरणा केल्यास त्यावर दहा टक्के सवलत मिळणार आहे. मे महिन्यात ८ टक्के आणि जून महिन्यात ६ टक्के सवलत दिली जाणार आहे. मालमत्ताधारकांनी कर भरण्यास सुरूवात झाली असून झोन पाच कार्यालयाची ४ लाख तर झोन सहा कार्यालयाची २ लाख वसुली झाली असल्याची माहिती करनिर्धारक व संकलक अपर्णा थेटे यांनी सांगितले.

कोरोनामुळे गतवर्षी महापालिकेला कर वसूलीत मोठा आर्थिक फटका बसला आहे. कोरोनामुळे खिळखिळी झालेली अर्थव्यवस्था आणि त्यातच निम्म्या प्रमाणात वसूली झाल्याने महापालिकेला नवीन आर्थिक वर्षात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. मालमत्ता करापोटी वर्षभरात १०७ कोटी ७६ लाख ७० हजार तर पाणीपट्टीपोटी २९ कोटी सहा लाख आठ हजार रुपये असे १३६ कोटी ८२ लाख ७८ हजार ३०५ रुपये तिजोरीत जमा झाले आहेत. यामुळे शहराच्या विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महापालिकेच्या तिजोरीत काही वर्षांपासून खडखडाट झाला आहे. तर दुसरीकडे कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची देणी आहे. हि देणी देणार कशी? हा प्रश्न महापालिकेपुढे उद्भवला आहे. गतवर्षी मार्च महिन्यात अचानक कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाऊन जाहीर झाले. त्यामुळे महापालिकेच्या वसुलीला चांगलाच फटका बसला.  कोरोना संसर्ग कमी होताच  गेल्या चार पाच महिन्यांपासून वसुलीने वेग घेतला.

या पार्श्वभूमीवर आता कोरोनाच्या काळातही मनपाने कर वसूलीस जोरदार सुरुवात केली आहे. पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी यंदा सुरूवातीपासून मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या वसुलीसाठी नियोजन करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार कर निर्धारक व संकलक अधिकारी तथा उपायुक्त अपर्णा थेटे या नियोजन करत आहेत.

महत्वाच्या बातम्या