fbpx

दहा दिवस उलटूनही भाजप नगरसेवकाच्या कुस्ती स्पर्धेचा राडा-रोडा मैदानातच

टीम महाराष्ट्र देशा: ‘हिंदूगर्जना चषक २०१८’ ही कुस्ती स्पर्धा १० फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी दरम्यान पुण्यातील सणस मैदानावर मोठ्या दिमाखात पार पडली . पुणे जिल्ह्यातील नामवंत मल्लांच्या सहभागामुळे तसेच लक्षणीय कुस्त्यांमुळे या स्पर्धेची मोठी चर्चा झाली, मात्र १० दिवस उलटून गेल्यानंतरही मैदानावरील राडा-रोडा तसाच असल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

हिंदू गर्जना प्रतिष्ठान, साने गुरुजी मित्र मंडळ, आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने तसेच भाजप नगरसेवक धीरज घाटे यांच्या पुढाकारातून ‘हिंदूगर्जना चषक २०१८’ या कुस्ती स्पर्धेचं पुण्यात आयोजन करण्यात आलं होत.कुस्ती स्पर्धा झाल्यानंतर मैदान पूर्ववत करून देणे हि आयोजकांची जबाबदारी असते. मात्र, १० दिवस उलटून गेल्या नंतरही मैदानावरील राडा-रोडा तसाच पडून असल्याने खेळाडूंमध्ये नाराजी वाढत आहे.

रोख ५ लाख रुपयांची बक्षिसे, बुलेट, चांदीची गदा, अशी खेळाडूंवर बक्षिसांची लयलूट करण्यात आली. कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी हे आवश्यकच आहे मात्र त्यामुळे चांगल्या मैदानाची अशा पद्धतीने दुरवस्था करणे म्हणजे इतर खेळ खेळत असलेल्या खेळाडूंवर अन्याय नव्हे का ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

सध्या काय आहे मैदानाची अवस्था

कुस्तीचा हा आखाडा मैदानाच्या मध्यभागीच उभारण्यात आला होता. त्यासाठी विटा ,सिमेंट, माती आदींचा वापर करण्यात आला होता. सध्या यातील बराच राडारोडा मैदानातच पडून आहे. तसेच मोठ्याप्रमाणावर कचरा देखील साचला आहे. १०० मीटर धावण्याचा सराव करणाऱ्या खेळाडूंना मोठ्याप्रमाणावर अडचण येत असून धावपटूंना एकाचा ट्रॅकचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे त्या ट्रॅकवर मोठी गर्दी होत असल्याने सराव व्यवस्थित होत नाही.

आमचे अंतर्गत काही वाद असल्याने महापालिकेच्या कोणत्याही क्रीडा कार्यक्रमात मी जात नाही. महापौर चषकात देखील माझा सहभाग नव्हता हे तुम्ही पाहिलंच असेल. या कार्यक्रमाच्या आयोजकांनी यात लक्ष घालायला पाहिजे. – सम्राट थोरात ( क्रीडा समिती अध्यक्ष )

आखाडा उभारण्यासाठी हे सगळं मटेरियल आणलं होत. मध्ये ट्रॅक असल्याने मॅन्युअली भरून राडा रोडा हटवावा लागत आहे. राडा रोडा हटवणाऱ्या संबधित व्यक्तीशी माझं बोलणं झालं असून मैदानावर असणारा राडा रोडा लवकरच हटवण्यात येईल.- नगरसेवक धीरज घाटे (आयोजक ‘हिंदूगर्जना चषक २०१८’)

संबंधित वॉर्ड ऑफिसर्स बरोबर बोलून लवकरात लवकर राडा रोडा हटवण्यात येईल. आणि लवकरच मैदान पूर्ववत करून खेळाडूंना उपलब्ध करून देण्यात येईल – मुक्ता टिळक (महापौर पुणे मनपा )