खेलो इंडिया :जलतरणात युगा, केनिशा व वेदांत यांची सोनेरी कामगिरी

पुणे : जलतरणात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वर्चस्व कायम राखले. त्यांच्या युगा बिरनाळे, केनिशा गुप्ता व वेदांत बापना यांनी आपल्या नावावर पुन्हा सुवर्णपदकाची नोंद केली.

केनिशा हिने १७ वषार्खालील मुलींच्या गटात २०० मीटर्स मिडले रिले शर्यत दोन मिनिटे २९.६८ सेकंदात जिंकली. तिच्या कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राने चार बाय १०० मीटर्स मिडले रिले शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली. त्यांनी ही शर्यत ४ मिनिटे ४३.०६ सेकंदात पूर्ण केली. कर्नाटकने हे अंतर ४ मिनिटे ३६.९१ सेकंदात पार करीत सुवर्णपदक जिंकले.

युगा बिरनाळे हिने आज रिले शर्यतीसह दोन शर्यतींमध्ये सुवर्णपदक तर एका शर्यतीत ब्राँझपदक जिंकले. तिने २०० मीटर्स मिडले शर्यत २ मिनिटे ३२.७५ सेकंदात पार करीत सुवर्णपदक जिंकले. तिने महाराष्ट्राला चार बाय १०० मीटर्स मिडले रिलेतही अजिंक्यपद मिळवून दिले. त्यांनी हे अंतर ४ मिनिटे ४१.१७ सेकंदात पूर्ण केले. त्याखेरीज तिने २०० मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यतीत तिसरे स्थान घेतले. तिला हे अंतर पार करण्यास २ मिनिटे ३४.०९ सेकंद वेळ लागला. गुजरातची माना पटेल (२ मिनिटे २३ सेकंद) व पश्चिम बंगालची सौबित्री मोंडल (२ मिनिटे २९.८० सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक पटकाविले.

मुलांच्या १७ वषार्खालील गटात वेदांत बापना या महाराष्ट्राच्या खेळाडूने २०० मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यत २ मिनिटे १०.४६ सेकंदात जिंकली. महाराष्ट्राच्या सुश्रुत कापसे याला २१ वषार्खालील आठशे मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत रौप्यपदक मिळाले. त्याने ही शर्यत ८ मिनिटे ३६.८९ सेकंदात पूर्ण केली. दिल्लीच्या कुशाग्र रावत याने ही शर्यत ८ मिनिटे १४.३१ सेकंदात जिंकली.