दुधपिशवीवर प्लास्टिक बंदी, तरी रिकामी पिशवी परत केल्यास ५० पैसे ग्राहकांना मिळणार

टीम महाराष्ट्र देशा :  दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवरदेखील बंदी होणार असून पुढील महिनाभर ही बंदी लागू करण्यात येणार आहे. पण दुधाची पिशवी घेऊन त्यानंतर ती परत केल्यास ग्राहकांना ५० पैसे कंपनी परत देईल, असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत जाहीर केलं.

राज्यात १२०० टन प्लास्टिकचा कचरा निर्माण होत होता. मात्र प्लास्टिक बंदीनंतर यातील ६०० टन कचरा कमी झाला, असं कदम यांनी सांगितलं. राज्यात १ लाख २० हजार २८६ टन प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. २४ कंपन्या दिवसाला ५५० टन प्लास्टिकवर प्रक्रिया करतात. सिमेंट कंपन्यांना ३ हजार टन प्लास्टिक वापरायला दिलं असल्याचंही ते म्हणाले.

राज्यात सापडणारं प्लास्टिक बाहेर राज्यातून येतं. एकट्या गुजरातमधूनच राज्यात ८० टक्के प्लास्टिक येत असल्यामुळं ते बंद करण्यासाठी मी स्वत: गुजरातच्या सीमेवर जाऊन प्लास्टिक घेऊन येणाऱ्या ट्रकवर कारवाई केली आहे, असंही कदम यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं.

दरम्यान, प्लास्टिक बंदी आणि कंपनीकडून रिकाम्या पिशवीवर ५० पैसे परत देण्याच्या या एकूण प्रक्रियेतील हा निर्णय नागरिकांसाठी महत्वाचा ठरणार आहे.