पिंपरी-चिंचवडमध्ये प्लाज्माचा तुटवडा, नगरसेविकेने प्लाज्मादान करून केली जनजागृती

sharda sonwane

चिंचवड : गेले साडेसहा महिने देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. सद्या कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये काहीशी घट झाली असली तरी दुसऱ्या लाटेची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. अजूनही अखंड विश्वामध्ये कोरोना व्हायरसवर यशस्वी लस शोधण्यात तज्ञांना यश आले नसले तरी शोधकार्य प्रगतीपथावर आहे.

दरम्यान, रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रभावी मार्ग म्हणून प्लाज्मा उपचार पद्धतीचा अवलंब केला जातो. कोरोनाने राज्यात प्रवेश केल्यापासूनच मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह औरंगाबाद शहरात कहर घातला आहे. त्यामुळे तातडीने जम्बो रुग्णालय देखील या शहरात उभारण्यात आले. रुग्णांच्या उपचारासाठी प्लाज्मा अतिशय महत्वाचा असल्याने त्याची मागणी देखील जास्त आहे, मात्र कोरोनामुक्तांमध्ये अफवा पसरवून भीती निर्माण केल्याने प्लाज्मा दात्यांमध्ये फारशी वाढ झालेली नाही.

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही महिन्यांपासून प्लाज्माचा तुटवडा वाढला असून जन्जारुती करून प्लाज्मा दानासाठी प्रोत्साहन मिळावं यासाठी महिन्याभरापूर्वी कोरोनावर मात करणाऱ्या नगरसेविका शारदा सोनवणे व त्यांचे पती हिरेन सोनवणे यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये प्लाज्मा दान केले आहे. यावेळी त्यांनी, ‘गैरसमजामुळे प्लाज्मादान करण्यास नागरिक पुढे येत नसून प्लाज्मा दान केल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे तरुण वर्गाला मी आव्हान करते त्यांनी समाजासाठी प्लाज्मा दान करावं’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

काल, पिंपरी-चिंचवडमध्ये २२८ नवे रुग्ण आढळले असून ४७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, कोरोनामुळे काल दिवसभरात ७ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत १,४६४ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

महत्वाच्या बातम्या-