fbpx

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विक्रीवर बंदी आणावी – बजरंग दल

eco-friendly-ganesha

पुणे  : मागील काही वर्षांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मुर्तींचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याबाबत बजरंग दल या संघटनेने केलेल्या एका पाहणीमध्ये, असे आढळून आले की, प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या मूर्ती पाण्यामध्ये विरघळण्यास अतिशय कठीण आहेत. तसेच त्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते. त्यामुळे अशा मूर्ती बनविणे व विक्री करणे यावर बंदी आणावी, अशी मागणी बजरंग दलाने केली आहे.

बजरंग दलाच्या वतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये असलेल्या घटक रसायनांमुळे विसर्जन काळात पाण्याची पीएच पातळी वाढून ते विषारी होते. त्यामुळे निर्माण होणा-या जल प्रदूषणाची समस्या भयावह आहे. या सगळ्याचा दूरगामी परिणाम पाण्यातील जीवसृष्टीवर होत असून त्यामुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्ती निर्मिती व विक्रीवर पिंपरी-चिंचवड शहरात बंदी आणावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

पाण्यात सहज विघटन होणा-या व कोणतेही प्रदूषण न करणा-या शाडू मातीपासून बनविलेल्या मूर्ती किंवा कोणत्याही इको फ्रेंडली मूर्ती जास्तीत जास्त बनविण्यात याव्यात, असे आवाहन बजरंग दलाकडून मुर्तिकारांना करण्यात येत आहे.