नागपूर येथे राजभवन परिसरात राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते वृक्षारोपण

नागपूर : राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज राजभवनातील पश्चिम प्रवेशद्वाराकडे असलेल्या निसर्ग पाऊलवाट परिसरात पिंपळ वृक्ष लागवड करुन परिसरातील दोन हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ केला. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

सेमिनरी हिल्स परिसरात असलेले राजभवन हे राज्यपालांचे शासकीय निवासस्थान असून इथला शंभर एकर परिसर हा जैवविविधतेने समृद्ध आहे. त्यापैकी 80 एकर जमिनीवर जैवविविधता पार्क आहे. देशात जैवविविधतेने समृद्ध असलेले हे एकमेव राजभवन आहे.

राज्यपालांनी वृक्षारोपणानंतर राजभवनातील परिसरात जे काही विदेशी वृक्ष आहेत त्यांच्या जागी प्रत्येक वर्षी स्वदेशी वृक्षांची लागवड करण्याची सूचना केली. तसेच इथली जैवविविधता आणखी समृद्ध करण्यासाठी खंड पडू देऊ नये. राजभवनाच्या परिसरात असलेल्या जैवविविधतेमुळे मधमाशा मोठ्या संख्येने वाढतील यादृष्टीने मधमाशांचे जतन व संवर्धन होण्यासाठी मधमाशांना आकर्षित करणारे विविध प्रजातीचे एक हजार झाडे लावावीत. यासाठी मृद व जल संधारणाच्या कामावर भर द्यावा. त्यामुळे मधमाशांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होईल असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

राजभवनाच्या परिसरात असलेल्या विविध वृक्षांवर जवळपास 164 प्रकारची वेगवेगळी स्थलांतरित व स्थानिक पक्षी आढळून आल्याचे सर्वेक्षण बॉम्बे नॅचरल हिस्ट्री या संस्थेने केल्याची बाब राज्यपालांचे अतिरिक्त परिवार प्रबंधक श्री. येवले यांनी राज्यपालांच्या लक्षात आणून दिली असता, आणखी पक्ष्यांचा अधिवास व किलबिलाट वाढावा यासाठी पक्ष्यांना आकर्षित करणारी आणखी एक हजार वृक्षांची लागवड करावी, अशा सूचनाही राज्यपालांनी यावेळी दिल्या.

एकीकडे इथली जैवविविधता समृद्ध करीत असताना दुसरीकडे या जैवविविधतेला धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना करुन राज्यपाल श्री. राव म्हणाले, राजभवनाच्या परिसरातील जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यास सहली ही अत्यंत प्रशंसनीय बाब असून इथला निसर्ग वाढविण्यात विद्यार्थ्यांचा हातभार लागला पाहिजे.

वनमंत्री मुनगंटीवार यांनी राजभवनाच्या परिसरात असलेल्या जैवविविधतेचे कौतुक केले. इथल्या विविध प्रकारच्या वृक्षांवर त्यांची नावे व त्याबाबत माहिती असलेला फलक लावल्यास इथली जैवविविधता बघणाऱ्यांना त्या झाडांबाबत अधिक माहिती मिळण्यासदेखील मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात यावर्षी लावण्यात येत असलेल्या 13 कोटी वृक्ष लागवडीबाबतची माहिती त्यांनी राज्यपालांना दिली. यावेळी त्यांनीदेखील वृक्षारोपण केले.

Rohan Deshmukh

राजभवन परिसरात मधमाशांना आकर्षित करणारी एक हजार आणि पक्षांचा अधिवास वाढावा यासाठी एक हजार अशा एकूण दोन हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ राज्यपालांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.

राजभवनाच्या परिसरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाला वन विभागाचे सचिव विकास खारगे, राज्यपालांचे सचिव वेणूगोपाल रेड्डी, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम्, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, राज्यपालांचे अतिरिक्त परिवार प्रबंधक रमेश येवले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

भिडे गुरुजींसह एक हजार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

वादग्रस्त समान पाणी पुरवठा योजनेच्या निविदा अखेर रद्द

Latur Advt
You might also like
Comments
Loading...