छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जयंतीनिमित्त तात्पुरता चबूतऱ्यावर बसवा : देशमुख

औरंगाबाद: दोन वर्षे झाली मात्र अद्यापही औरंगाबाद महानगर पालिकेने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या क्रांती चौकातील स्मारकाचे काम पूर्ण झाले नसल्याने शिवप्रेमींचा हिरमोड झाला आहे. येत्या १९ फेब्रुवारी रोजी क्रांती चौकात पूर्वी असलेला छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा जयंतीनिमित्त तात्पुरता पुन्हा चबूतऱ्यावर बसवावा अशी मागणी औरंगाबाद मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा माजी नगरसेवक अभिजीत देशमुख यांनी केली आहे.

प्रत्येकाच्याच मनामनात शिवराय अधिष्टीत आहेत आणि त्यामुळेच शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने साजरी केली जाते. गेल्या दोन वर्षापासुन क्रांती चौकात शिवरायांच्या स्मारकाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. मागील दोन्ही शिवजयंतीला शिवरायांच्या स्मारकाचे काम पूर्ण झाले नसल्याने शिवप्रेमींचा प्रचंड हिरमोड झाला.यंदाच्या शिवजयंतीलाही तीच परिस्थिती असल्याने शिवप्रेमी मधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या शिवजयंतीला महापालिकेने काही अंशी पूर्ण केलेल्या क्रांती चौकातील शिवस्मारकाच्या चबूतऱ्यावर जो शिवरायांचा जुना अस्तित्वात असलेला पुतळा शिवजयंती निमित्ताने पुन्हा तात्पुरता बसवावा अशी मागणी अभिजित देशमुख यांनी निवेदनाद्वारे मनपा आयुक्त तथा प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांच्याकडे केली आहे. कोरोनाचे संकट जरी असले तरी येणारी शिवजयंती शासनाच्या व आरोग्य विभागाच्या नियमानुसारच साजरी केली जाणार असल्याचे औरंगाबाद मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा माजी नगरसेवक अभिजीत देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या